संतोष हळदणकर की नारायण गांवस?
लोगो - वाळपई पोटनिवडणूक
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्ष प्रदेश समितीच्या निवडणूक समितीची बैठक आज येथे होऊन तीत संभाव्य उमेदवारांबाबत सविस्तर चर्चा करण्यात झाली. या चर्चेअंती संतोष हळदणकर व नारायण गांवस यांच्या नावांची शिफारस वाळपई पोटनिवडणुकीसाठी श्रेष्ठींकडे करण्यात आल्याचे सांगण्यात आले. उद्या २६ रोजी संध्याकाळी यांपैकी एकाची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली जाईल, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस प्रा.गोविंद पर्वतकर यांनी दिली.
भाजपच्या केंद्रीय गोवा प्रभारी श्रीमती आरती मेहरा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, खासदार श्रीपाद नाईक , सरचिटणीस गोविंद पर्वतकर आदी नेते हजर होते. माजी उपसभापती नरहरी हळदणकर यांनी प्रकृती ठीक नसल्यामुळे रिंगणातून माघार घेत असल्याची विनंती समितीसमोर केली. कॉंग्रेसचे उमेदवार विश्वजित राणे यांना टक्कर देण्यासाठी युवा उमेदवाराचीच निवड करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, संतोष हळदणकर हे माजी उपसभापती नरहरी हळदणकर यांचे बंधू आहेत तर नारायण गांवस हे वाळपई गट भाजपाध्यक्ष आहेत. या दोघांचाही या मतदारसंघात चांगल्यापैकी लोकसंपर्क आहे. यांपैकी कोणालाही उमेदवारी मिळाली व भाजपच्या नेत्यांनी प्रचाराकाळात कंबर कसली तरी विश्वजित राणे यांना नक्कीच ही निवडणूक कठीण ठरणार आहे. वाळपई पोटनिवडणूक जाहीर होऊनही भाजपच्या एकाही बड्या नेत्याकडून अद्याप विश्वजित राणे यांचा समाचार घेतला जात नाही, अशी तक्रार काही जण करीत आहेत; पण भाजपने केलेल्या नियोजनबद्ध व्यूहरचनेची प्रचिती लवकरच मतदारांना येईल. निवडणूक प्रचार काळात विश्वजित राणे यांची संपूर्ण कुंडलीच लोकांसमोर ठेवली जाईल,असेही भाजप नेत्यांनी सांगितले.
वाळपईत भाजपचे अस्तित्वच संपवले आहे अशी शेखी मिरवणाऱ्या विश्वजित राणे यांना येत्या निवडणूक काळात सत्यस्थितीची प्रखर जाणीव होईल. वाळपईतील लोक गप्प आहेत याचा अर्थ ते आपल्याला पाठिंबा देतात अशा भ्रमांत विश्वजित राणे वावरत आहेत. वाळपईवासीय त्यांना इंगा दाखवतील,असे प्रा. पर्वतकर म्हणाले.
सत्तेचा गैरवापर करून वाळपईभोवती खाण उद्योगांचे पाश आवळले जात आहेत. वाळपईवर व एकूणच सत्तरी तालुक्यावर भविष्यकाळात खाणींचे भीषण संकट ओढवण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने वाळपईला या संभाव्य संकटातून वाचवण्याची सुवर्णसंधी या पोटनिवडणुकीनिमित्ताने लोकांना प्राप्त झाली आहे. भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता उमेदवार बनून विश्वजित राणे यांचा पराभव करू शकतो हेच या पोटनिवडणुकीतून लोकांना आम्ही दाखवून देऊ, असा आशावादही प्रा.पर्वतकर यांनी व्यक्त केला.
Sunday, 26 September 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment