Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 29 September 2010

सरकार चालवता येत नसेल ..तर चालते व्हा

गोवा बचाव अभियान पुन्हा आक्रमक
१४ रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर धडक
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): सध्या सरकार नावाची चीज अस्तित्वातच नाही हे भोंगळ प्रशासकीय कारभारावरून स्पष्ट होते व त्यामुळे या सरकारच्या नावाखाली खुर्च्या अडवून बसलेल्यांना आता घरी पाठवणेच योग्य ठरेल. प्रादेशिक आराखडा २०२१ बाबत सरकारने दिलेली सर्व आश्वासने फोल ठरली आहेत. येत्या १४ ऑक्टोबर २०१० पासून पुन्हा राज्यव्यापी आंदोलन सुरू केले जाणार असून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या निवासस्थानावर धडक मोर्चा नेऊनच या आंदोलनाला सुरुवात होईल, अशी घोषणा गोवा बचाव अभियानाच्या निमंत्रक सेबिना मार्टीन्स यांनी केली.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या प्रसंगी अभियानाच्या सचिव रिबोनी शहा हजर होत्या. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सप्टेंबर अखेरपर्यंत काणकोण व पेडणे तालुक्याचे आराखडे खुले करण्याचे आश्वासन विधानसभेत दिले होते. आता सप्टेंबर संपत आला तरी तशी चिन्हे अजिबात दिसत नाहीत. नगर व नियोजन कायद्याचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या समितीची एकही बैठक झाली नाही, यावरून सरकार केवळ जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकत असल्याचेच दिसून येते, अशी टीकाही यावेळी करण्यात आली. प्रादेशिक आराखडा निश्चित झाला नसतानाही विविध ठिकाणी मोठी बांधकामे सुरू आहेत. राज्य सरकारने अशी बांधकामे स्थगित ठेवण्यासाठी तात्काळ अधिसूचना जारी करावी; तसेच पर्यावरणीय संवेदन क्षेत्राचे रक्षण करण्यासाठीही अधिसूचनेची गरज आहे, असे यावेळी श्रीमती मार्टीन्स यांनी सांगितले.
विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या बड्या गृह तथा व्यापार प्रकल्पांबाबत कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही व त्यामुळे भविष्यात स्थानिकांसमोर भीषण संकटे उभी राहणार आहेत. वनक्षेत्र तथा अभयारण्य क्षेत्रात बेकायदा खाणींचा उच्छाद सुरू आहे व सरकार मात्र मूग गिळून गप्प बसले असल्याचा ठपकाही यावेळी ठेवण्यात आला. राष्ट्रीय महामार्गांच्या रुंदीकरणात अजिबात पारदर्शकता नाही व त्यामुळे स्थलांतरित होण्याची शक्यता असलेल्या लोकांना याची काहीही माहिती नाही.
गोवा बचाव अभियानातर्फे १४ ऑक्टोबर रोजी गोमंतकीयांना आझाद मैदानावर एकत्र येण्याचे आवाहन केले गेले असून तिथून थेट मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानावर मोर्चा नेला जाणार आहे. दरम्यान, वाळपई पोटनिवडणुकीमुळे उत्तर गोव्यात १४४ कलम लागू करण्यात आल्याने या आंदोलनावर मर्यादा येत असल्यास दिगंबर कामत यांच्या मडगावातील निवासस्थानावर मोर्चा नेला जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. या आंदोलनाची जागृती करण्यासाठी आत्तापासूनच विविध ग्राम समित्या व इतर संघटनांशी संपर्क साधण्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

No comments: