Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 29 September 2010

लोकांनाच खाणी हव्यात! विश्वजित राणेंचे नवे तर्कट

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): खनिज व्यवसायामुळेच या मागासलेल्या सत्तरी तालुक्यात लोकांच्या दारात चार चार वाहने उभी असल्याचे चित्र आपल्याला पाहावयास मिळते आहे. या खाणी बंद झाल्यास येथील स्थानिकांना नोकऱ्या कोण देणार, असा प्रश्न करून लोकांनाच हव्या असणाऱ्या या खाण व्यवसायाला आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे धक्कादायक विधान वाळपई मतदारसंघाचे कॉंग्रेसचे उमेदवार विश्वजित राणे यांनी केले व सत्तरीत फोफावत असलेल्या खाण व्यवसायाचे खापर अप्रत्यक्षरीत्या तेथील सामान्य जनतेवरच फोडले.
वाळपईत होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पणजी येथील आपल्या खाजगी बंगल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विश्वजित बोलत होते. आपले कोणत्याही खाण कंपनीशी संबंध नाहीत; असल्यास ते सिद्ध करून दाखवावेत, असे आव्हानही श्री. राणे यांनी यावेळी दिले.
या खाण कंपन्यांना जर केंद्र सरकारच परवानगी देत असेल तर त्यांना विरोध करणारे आम्ही कोण, असा सवाल करून लोकांचा जर विरोध असेल तर आपलाही या खाण व्यवसायाला विरोधच असणार आहे, असे त्यांनी पुढे स्पष्ट केले. पिसुर्ले, खोतोडे येथे आधीपासूनच खाणी आहेत. येथील लोकांचा त्याला विरोध नाही. या व्यवसायामुळे लोकांच्या दारात चार चार वाहने उभी राहिली आहेत. दरमहा पंधरा हजार रुपये कमावले जात आहेत. पर्यावरण सांभाळण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे सांगत वाळपई भागात एकही बेकायदा खाण नसल्याचा दावा यावेळी श्री. राणे यांनी केला.
पैकुळे येथे मुंबई येथील एक व्यक्ती खाण कंपनी सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याने येथील प्रत्येक घराला २० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवले आहे. मात्र ही खाण येथील पाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या अतिशय जवळ असल्याने त्यावर आमदार या नात्याने आपण मत व्यक्त करणार आहोत. त्याचप्रमाणे, ही बाब मुख्यमंत्र्याच्याही निदर्शनास आणून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काही लोक "धूळ भत्ता' घेण्यासाठीच विरोध करतात. जेथे जास्त प्रदूषण झाले आहे त्या गावातील लोकांचे खाण कंपनीने स्थलांतरण केले आहे. यात काही गैर आहे असे आपल्याला अजिबात वाटत नाही. सत्ता नसल्यानेच काही लोकांकडून खाण कंपन्यांना विरोध केला जात असल्याची टीकाही श्री. राणे यांनी यावेळी केली.
वाळपईची पोटनिवडणूक ही एकतर्फीच होणार असून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराची अनामत रक्कमही जप्त होईल, असा दावा त्यांनी यावेळी केला. या निवडणुकीत केवळ विकासाचा मुद्दा नजरेसमोर ठेवूनच प्रचार केला जाणार आहे. दोन्ही उमेदवार तरुण आहेत व लोकांना कोणत्या उमेदवाराला मतदान करावयाचे आहे तेही माहीत आहे, असेही ते म्हणाले. भाजपच्या दहा वर्षाच्या काळात वाळपईत कोणताही विकास झाला नसल्याचा दावा करून आपले वडील प्रतापसिंह राणे यांनी आणि आपण आमदार झाल्यानंतर या मतदारसंघाचा विकास केला असल्याचे त्यांनी सांगितले. नगरगाव येथे दहा कोटी रुपये खर्च करून रस्ता बांधला आहे. येत्या काही महिन्यांत वाळपईतील एकही रस्ता "हॉटमिक्स'शिवाय राहणार नाही, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
------------------------------------------------------------------
"ज्यावेळी कॉंग्रेस पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी मी प्रयत्न करीत होतो त्यावेळी ते दिले गेले नाही. आता खुद्द कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्वतःच मला बोलावून कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्यास सांगितले आणि तिकिटही दिले."

No comments: