Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 30 September 2010

जोनाह चालवणार रेमोचा वारसा..

शैलेश तिवरेकर
पणजी, दि. २९ - गोव्यातील प्रख्यात पॉप गायक रेमो फर्नांडिस यांचा वारसा येतोय त्यांचा सुपुत्र जोनाह फर्नांडिस याच्या रूपाने. परशुरामाच्या या भूमीत अटकेपार झेंडे लावणारे कलेचे अनेक उपासक तयार झाले. त्यांनी शास्त्रीय, उपशास्त्रीय, भारतीय, पाश्चात्त्य संगीतक्षेत्रावर स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवला.
आता त्यांचा वारसा पुढे नेण्याकरिता त्यांचे कुटुंबीय किंवा त्यांच्या शिष्याच्या रूपाने कलाकार तयार होऊन त्यांनी विविध कलांचा प्रवाह कायम ठेवला आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या पॉप गायनाने रसिकांच्या हृदयात आपली अशी खास जागा निर्माण करणारे पॉप गायक रेमो फर्नांडिस यांच्या सुपुत्राने बालपणापासूनच पाश्चात्त्य संगीत क्षेत्रात पाय रोवण्यास सुरुवात केली. आज तोही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कलेची नवनवी क्षितिजे सर करण्यास सज्ज झाला आहे.
जोनाह फर्नांडिस, कृष्णा, केविन आणि शेल्डन यांचे स्वतःचे संगीत पथक असून त्या पथकाद्वारे ते अनेक स्टेज शो करत आहेत. स्वतः जोनाह हा बेस गिटार वाजवतो; तसेच ब्लुईश संगीत आणि सेव्हंटीज रॉक अँड रोल संगीत पद्धतीने गातो. केविन हा कीबोर्ड, शेल्डन हा गिटार व कृष्णा हा ड्रमसेटची बाजू संभाळतो. धडपड्या आणि मेहनती कलाकाराच्या सर्व खुणा जोनाहमध्ये दिसतात. एखादे काम हाती घेतले की, तनमन अर्पून कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे ही त्याची खासियत. राजेंद्र तालक यांच्या "ओ मारिया' या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी याचा अनुभव अनेकांना आला. बागा कळंगुट येथे "ओ मारियाचे' चित्रीकरण सुरू असताना त्याने सकाळी ९ वाजल्या पासून ते संध्याकाळी ८ पर्यंत आपल्या साथीदारांसमवेत चित्रीकरण स्थळी राहून अगदी आनंदाने चित्रीकरण पूर्ण केले. एखादा भाग मनासारखा होत नसेल तर तो पुन्हा चित्रित करण्याची विनंती तो स्वतः दिग्दर्शकांना करत होता. जोपर्यंत एखादे दृश्य हवे तसे होत नाही तोपर्यंत प्रयत्न करणे हा त्याचा जणू स्थायिभावच बनला आहे. कलाक्षेत्रात स्वतःला झोकून देण्याऱ्या कलाकाराची हीच खरी साधना असते. हुबेहूब रेमोसारखा दिसणारा जोनाह यांनी "ओ मारिया' चित्रपटात रेमो फर्नांडिस यांच्या गीतावर गायक कलाकाराचा सुरेख अभिनय केला आहे. गायन आणि वादनाबरोबर जोनाहने अभिनयाची कलाही जोपासली आहे.
या संदर्भात विचारले तेव्हा म्हापशातील सेंट झेवियर महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकणारा जोनाह म्हणतो, गायन आणि वादनाचा संपन्न वारसा मला घरातच लाभला. त्यामुळे तो पुढे नेणे हे माझे कर्तव्य आहे असे मी मानतो.
या क्षेत्रात लौकिक मिळाल्यास रेमोचा मुलगा म्हणूनच माझे चाहते मला ओळखतील. मला ते हवे आहे. तथापि, अभिनय किंवा इतर गायन पद्धतीने मला माझी स्वतंत्र ओळख निर्माण करणे आवडेल.
तरल मन आणि सुस्वभावी जोनाहचे पाय अजूनही जमिनीवर असल्याचे त्याच्याशी बोलताना जाणवले. कोणताही बडेजाव न आणता तो सहज संवाद साधत होता. आपल्या सहकारी कलाकारांची त्याने मुक्तकंठाने स्तुती केली. तो म्हणाला, कला क्षेत्रात एकट्याने पोहण्यापेक्षा आपल्या साथीदारांसमवेत पोहण्यातच आगळा थरार असतो. "साथ साथ चलो' हे तत्त्व मला विशेष भावते.
माझे सगळे साथी कलाकारही स्वतःची स्वतंत्र ओळख गायनात व वादनात निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. गोव्यात अनेक ठिकाणी आम्ही खूप कार्यक्रम केले आणि करत आहोत; परंतु गोव्याबाहेर जाण्याची संधी अद्याप मिळाली नाही. त्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. कारण गावात प्रत्येकजण राजा असतो. दाद मिळायला हवी ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर. तेथे जाऊन स्वतःला पारखायचे आहे की आम्ही कुठे आहोत?
कला क्षेत्रातील या हरहुन्नरी तरुणाईला आमच्या खास शुभेच्छा.

No comments: