Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 26 September 2010

साधनेने जीवन परिपूर्ण बनते


थोर गुरू श्री श्री रविशंकर यांचे रसाळ आशीर्वचन
कोलवा किनारी सत्संगाला
लोटला साधकांचा महापूर

मडगाव, दि. २५ (प्रतिनिधी) - जीवन आणि साधना एकमेकांपासून वेगळे करणे अशक्य असून जीवन हे साधन आहे. कोणतेही लक्ष्य साध्य करण्यासाठी करुणावश होऊन
साधना करणे आवश्यक असते. कारण साधनेने जीवन परिपूर्ण बनते. जेथे नदी सागराला मिळते अशा सागर किनाऱ्यावरील आनंदोत्सवाने जीवन प्रसन्न बनेल, असा संदेश "आर्ट ऑफ लिव्हिंग'चे शिल्पकार तथा थोर आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी कोलवा समुद्र किनाऱ्यावरील हजारो भक्तांच्या महासत्संगानिमित्त आनंदोत्सवात दिला.
"आर्ट ऑफ लिव्हिंग'ने कोलवा समुद्र किनाऱ्यावर महासत्संग आयोजित केला होता. त्यासाठी सुशोभित असे काटकोनी व्यासपीठ उभारण्यात आले होते. त्या सजवलेल्या व्यासपीठावर "वसुधैवकुटुंबकम्' असा संदेश कोरण्यात आला होता. सर्वत्र फुलांचे ताटवे उभारले होते. महासंत्सगात सहभागी झालेला महाजनसमुदाय प्रसन्न मनाने बसला होता. भजन गाताना मग त्यांनीही फेर धरला. या महासत्संगाला देशभरातील ५०० पेक्षा जास्ती साधक तसेच गोव्यातील हजारो स्त्री पुरुष, तरुण तरुणी उपस्थित होत्या.
गुरू रविशंकर म्हणाले, एक एक व्यक्ती म्हणजे नदी आहे. ती समाजरुपी सागराशी एकरूप होते तेव्हा सर्वांनाच त्यातून सुख मिळते. मन असीम आहे. ते प्रसन्न राहण्यासाठी सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे. ईश्वर सर्वेसर्वा आहे. त्याच्याशी नाते पक्के करा. मग तुम्हाला कसलीच कमतरता भासणार नाही.
क्षमा मागणे व क्षमा करणे हेच जीवनाचे सार आहे. आपल्या हातून कोणतीही चूक झाली तर आपण जेव्हा माफी मागतो, तेव्हा क्षमा करणारा व क्षमा मागणाऱ्याचेे मन प्रसन्न होते. काही जण माफी मागण्यास घाबरतात. खरेतर माणसाच्या हातून अज्ञानातून चूक घडते, तेव्हा क्षमा मागितली पाहिजे. द्वेष, मत्सर केल्यानंतर, क्षमा मागितल्यावर त्याचे व आपले मन प्रसन्न होते. मात्र काही जण द्वेष करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देतात. त्यातून द्वेषभावना वाढते. त्याचबरोबर प्रोत्साहन देणाऱ्याला दांभिक समजले पाहिजे, असे स्वामीजी म्हणाले.
गोवा म्हणजे "गो' व "आ' असून या सुजलाम प्रदेशात मन प्रसन्न होते. अशा प्रसन्न वातावरणातील महासत्संगात सर्वांचीच मने प्रसन्न होऊन जातील असेही श्री श्री रविशंकर यांनी सांगितले.
नंतर साधकांनी त्यांच्याशी थेट संवाद साधला आणि प्रश्नोत्तरे झाली. दारूच्या नशेत असलेले चारदा सत्संगात सहभागी झाल्यास ती नशा सुटते. अशा लाखो लोकांची दारूच्या व्यसनातून मुक्ती झाली आहे.
प्रवास नायक व व्यंकटेश हेगडे यांनी स्वागत केले. नंतर कॅसेट व कॅसेट आणि पुस्तकांचे याप्रसंगी प्रकाशन झाले. संध्याकाळी पाच वाजल्यापासून भजने सुरू झाली. श्री श्री रविशंकर यांचे साडेसहा वाजता आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यापासून व्यासपीठापर्यंत महिला हातात फुले, कुंभ घेऊन उभ्या होत्या. घुमट, ताशे, टाळ मृदंगाच्या तालावर श्री श्री रविशंकर यांचे स्वागत करण्यात आल्यानंतर त्यांना अत्यंत आदरपूर्वक व्यासपीठावर नेण्यात आले. व्यासपीठावर आगमन होताच त्यांनी सर्व साधकांना शुभेच्छा दिल्या. नंतर भजनाचा शानदार कार्यक्रम पार पडला. या महासत्संगासाठी ४ वाजल्यापासून कोलवा येथे प्रचंड गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. दरम्यान, "नानू रिसॉर्ट' येथे चार दिवसांचे "प्रगत शिबिर' सुरू असून उद्या (रविवारी) त्याची सांगता होणार आहे. उद्या सकाळी रवींद्र भवनात थोर गुरू रविशंकर हे युवकांना मार्गदर्शन करणार आहेत.

No comments: