कोलंबो, दि. १४ - आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या थरारक अंतिम लढतीत आज येथे महेंद्रसिंग धोनीच्या शिलेदारांनी यजमान श्रीलंकेला ४६ धावांनी चारीमुंड्या चीतपट करून झळाळत्या "कॉंपॅक' चषकावर आपले नाव कोरले आणि तमाम देशवासीयांना आगळा नजराणा पेश केला. दणकेबाज शतक (४४ वे) झळकावलेला "मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकर या शानदार लढतीचा आणि स्पर्धेचाही "मानकरी' ठरला. हरभजनसिंगचा तीक्ष्ण मारा (पाच बळी) आणि त्याला सुरेश रैनाने दिलेली तेवढीच तोलामोलाची साथ हे भारतीय गोलंदाजीचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. तसेच सचिनने "सामनावीर' हा बहुमान ५९ व्या वेळी संपादन केला तर १४ वेळी तो "मालिकावीर' ठरला.
गेल्या शनिवारी याच प्रेमदासा मैदानावर भारताला यजमानांकडून दारूण पराभव स्वीकारावा लागला होता. त्या रंगीत तालमीच्या लढतीत जरी भारतीय संघ कमी पडला होता तरी आज त्याचे पुरेपूर उट्टे धोनीच्या सेनेने काढले. या अंतिम लढतीत भारताने यजमान श्रीलंकेपुढे विजयासाठी ३२० धावांचे भरगच्च लक्ष्य ठेवले होते. तथापि, त्यांना ते पेलवले नाही. त्यांचा सारा संघ ४६.४ षटकांत २७३ धावांत गारद झाला. कर्णधार कुमार संगकारा स्वयंचीत (हिट विकेट) झाला आणि तोच या महत्त्वपूर्ण लढतीला कलाटणी देणारा क्षण ठरला. खरे सांगायचे तर आजचा दिवस श्रीलंकेचा नव्हताच. अर्थात भारतानेही काही वेळा अगदीच बेफिकीरी दाखवली. सुदैवाने त्याचे मोल पराभवाच्या रूपाने मोजावे लागले नाही.
यजमान संघाकडून थिलीना कंदांबी याने सर्वाधिक म्हणजे ६६ (९४ चेंडू व ४ चौकार), तिलकरत्न दिलशान याने ४२ (२९ चेंडू ९ चौकार), सलामीवीर सनथ जयसूर्याने ३६ (२९ चेंडू ७ चौकार) व कुमार संगकारा याने ३३ धावा चोपल्या. भारताकडून भज्जीने ९.४ षटकांत ५६ धावा देत श्रीलंकेचा निम्मा संघ कापून काढला. सुरेश रैनाने ८ षटकांत अवघ्या २६ धावा देऊन एक बळी मिळवला. युवराजसिंग, ईशांत शर्मा, आर. पी. सिंग व युसुफ पठाण यांनी प्रत्येकी एक गडी मटकावला.
गोव्यात आनंदाला उधाण
भारताचा हा शानदार विजय गोव्यातही अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. "माही'च्या वाघांनी अजिंक्यपद पटकावताच क्रिकेटप्रेमींनी परस्परांना शुभेच्छा दिल्या अन् फटाक्यांची आतषबाजी केली! १९९९ पासून भारतीय संघ २१ वेळा अंतिम फेरीत पोहोचला असून सतरा वेळा त्यांच्या पदरी पराभव पडला. दोनदा भारतीय चमू अजिंक्य ठरला तर दोनदा त्यांना संयुक्त विजेतेपद मिळाले. (आधाचे वृत्त पान १२ वर)
Tuesday, 15 September 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment