Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 13 September 2009

आंबेडकरांच्या पुतळ्याची कुडचड्यात तोडफोड



भाजपकडून घटनेचा तीव्र निषेध


कुडचडे, दि. १२ (प्रतिनिधी): राज्यातील मूर्ती तोडफोडीच्या प्रकरणांमागील सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यास सरकार अपयशी ठरलेले असतानाच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुडचडे येथील पुतळ्याची मोडतोड करण्याची क्रूर घटना काल रात्री अज्ञाताकडून करण्यात आली. आज सकाळी या घटनेची माहिती मिळताच कुडचडे भागातील जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
मारुतीगडाच्या पायथ्याशी असलेल्या मुख्य रस्त्यावरील सांगे केपे, चांदर येथे जाण्यासाठी असलेल्या सांगे चार रस्त्याच्या मध्यभागी सुमारे १३ वर्षापूर्वी बसविण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या पुतळ्याची रात्रीच्या दरम्यान काही अज्ञातांनी मोडतोड करून मानेवरचा भाग पुतळ्यापासून वेगळा केला. सुमारे अडीच ते तीन मीटर उंचीवर असलेला सदर भाग घटनास्थळाहून दूर नेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कुडचड्यात सहकारी बॅंकेच्या एका कार्यक्रमानिमित्त आलेले गृहमंत्री रवी नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. समाजात दुफळी निर्माण करण्याच्या हेतूने काही समाजकंटकांनी केलेल्या सदर कृत्याचा त्यांनी निषेध केला. याप्रकरणात गुंतलेल्यांना गजाआड करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असून उद्ध्वस्त केलेला डॉ. आंबेडकरचा पुतळा पूर्ववत उभारण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुतळ्याला कायमस्वरूपी सुरक्षा पुरविण्यासाठी तेथे सुरक्षा रक्षक नेमण्याचा आदेश त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला.
तत्पूर्वी सदर घटनेची माहिती मिळताच दक्षिण गोवा जिल्हाधिकारी गोकुळदास नाईक, उपजिल्हाधिकारी वेनान्सिओ फुर्तादो, केपे मामलेदार सुदिन नातू, कुडचड्याचे आमदार श्याम सातार्डेकर, पोलिस अधीक्षक ऍलन डिसा, उपअधीक्षक रोहिदास पत्रे, केप्याचे आमदार बाबू कवळेकर, नगराध्यक्ष परेश भेंडे, नगरसेवक देऊ सोनू नाईक, मारुती नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती हाताळली.
संशयितांचा शोध घेण्यासाठी ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाची मदत घेण्यात आली तसेच कुडचडे व आजूबाजूच्या परिसरात पोलिसांना पाठवून तपासकार्य हाती घेण्यात आले आहे. आमदार सातार्डेकर यांनी सदर घटनेचा तीव्र निषेध करताना जनतेने अशा प्रवृत्तींना पाठबळ न देता गुन्हेगारांना शोधून काढण्यास पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
संध्याकाळी अखिल गोवा दलित महासंघाचे अध्यक्ष वसंत परवार व इतर पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पोलिस निरीक्षक नीलेश राणे यांची भेट घेऊन सदर प्रकरणामध्ये तपासकामास गती देण्याची मागणी केली.

बॉक्स
भाजपने सदर घटनेचा तीव्र निषेध करत गेल्या काही काळापासून घडत असलेल्या मूर्ती तोडफोड प्रकरणांना आळा घालण्यात सरकारला अपयश आल्याचे सांगितले. देशाला घटना मिळवून देणारे बहुजन समाजाचे नेते डॉ. आंबेडकर यांची कुडचड्यात तोडफोड होणे ही लांच्छनास्पद गोष्ट आहे. या प्रकरणाचा छडा येत्या १० दिवसाच्या आत न लावल्यास भाजप तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच सरकारने अशा घटनांनी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
गृहमंत्री रवी नाईक यांनी घटनास्थळी येऊन आपली बेजबाबदार वृत्तीच दाखवून दिल्याचा आरोप भाजपने केला. घटनास्थळी उपस्थित असलेले दलित संघटनेचे एक पदाधिकारी पांडुरंग परवार या ज्येष्ठ नागरिकाने पुतळ्याला सुरक्षा पुरविण्याची मागणी केली असता "तुम्हीच राहता का या पुतळ्याची सुरक्षा करायला', असे सांगून अपमानित केल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी भाजपचे गोवा सचिव नरेंद्र सावईकर, विनय तेंडुलकर, भाजप अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष विठू मोरजकर, उपाध्यक्ष पांडुरंग परवार, आशिष करमली, कुडचडे भाजप अध्यक्ष पांडुरंग देसाई, युवा अध्यक्ष कपिश सावंत देसाई, रुद्रेश तेंडुलकर, नगरसेवक अभय खांडेकर इत्यादी उपस्थित होते.

No comments: