सुरसृष्टी शोकाकूल
पुणे, दि. १६ - " उदास झाले सूर, अंतरी उठले किती काहूर ! संवादिनी क्षणि मूक जाहली. साधक गेला दूर!' अशा शब्दात ज्यांच्याविषयी चाहते आपल्या भावना व्यक्त करतात, ते सुरसम्राट आज अनंतात विलीन झाले. ज्येष्ठ हार्मोनिअम वादक अप्पा जळगावकर यांचे आज सकाळी ६ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने सुरसृष्टी शोकाकूल झाली.
अप्पांचा जन्म जालना येथे झाला. सुरुवातीच्या काळात अप्पा जळगावकर ओळखले जायचे ते त्यांच्या ध्रुपद गायकीसाठी. त्यानंतर जालना शहराला निरोप देऊन त्यांनी पुणे गाठले. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी त्यांचे पुण्यात आगमन झाले. आणि नंतर ते आपल्या सुरयात्रेह पक्के पुणेकर बनून गेले. ध्रुपद गायकीच्या मैफलींमध्ये सुरुवातीच्या काळात त्यांचे मन रमत असे. नंतरच्या काळात त्यांनी हार्मोनिअम वादन आरंभले. उल्लेखनीय बाब म्हणजे हार्मोनिअम वादनासाठी त्यांनी कोणत्याही अधिकृत गुरूंकडून ज्ञानार्जन केले नाही. परंतु सरस्वतीची कृपादृष्टी असलेल्या आणि नटेश्र्वराचे वरदान लाभलेल्या या स्वयंसिद्ध स्वरसाधकाने हार्मोनिअम वादनात स्वतःचे "ध्रुवपद' निर्माण केले, ते केवळ कलेप्रति असलेल्या श्रद्धेच्या आणि आत्मशक्तीच्या बळावर!
पुण्यात आल्यावर त्यांची ओळख स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्याशी झाली. इथेच त्यांच्या जीवनाला नवी कलाटणी मिळाली. तो जणू काही "स्वर आणि सूरां'चा मिलाफ होता. त्यानंतर पंडितजींच्या बहुतांशी मैफलीत अप्पांनी आपल्या बहारदार हार्मोनिअम वादनाने रंग भरले. किशोरी आमोणकर, कुमार गंधर्व, मालिनी राजूरकर, माणिक वर्मा अशा अनेक दिग्गजांच्या मैफली रंगल्या त्या अप्पांच्या हार्मोनिअमच्या सुरात... "लहेरा' आणि "ताला'चे त्यांना असलेले ज्ञान तर अगाध होते. संगीत शास्त्रातही ते पारंगत होते. संगीत क्षेत्रातील दिग्गज त्यांना संयमी वादक म्हणून ओळखतात. समोर गायक कोणताही असो, त्याचा आवाज, त्याच्या कंठातून निघणारे राग, त्याचे स्वर अगदी अचूक आपल्या बोटांच्या इशाऱ्यांवर स्वरबद्ध करण्याची त्यांची हातोटी काही औरच! त्यांनी गायकाच्या गायनाला अतिरिक्त जोड कधी दिली नाही तर ते त्यांच्याशी अगदी समरस होऊन गेले. अप्पांविषयी सांगितले जाते की, ते कलाकार म्हणून जितके थोर होते, त्याहून अधिक एक सहृदयी व्यक्ती म्हणून त्याचे मोठेपण कौतुकास्पद होते, त्यामुळे त्यांच्या तालमीत तयार होण्यासाठी शिष्यांची रांग लागली तर नवल ते काय? त्यांच्या तालमीत अनेक हार्मोनिअम वादक तयार झाले. त्यांच्या शिष्य परिवार बराच मोठा होता. मुकुंद फडकरी, राहुल देशपांडे या काही नावाजलेल्या शिष्यांचाही त्यात समावेश आहे. अप्पा आणि गोवा हे नाते खूप जवळचे होते. इथल्या अनेक संगीत मैफलींना अप्पांची साथ असायची. एका बाजूने मान वाकत कान खांद्याला लावून अप्रतिम सूर काढण्याची त्यांची ढब गोमंतकीयांना खूप आवडायची. गायक किंवा त्यांच्यासोबतचा दुसरा कलाकार कितीही मोठा असो, अप्पा येथे दाद घेऊन जायचे. चार वर्षांपूर्वीच अप्पांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती स्वास्थ्य हरवले होते. ते अंथरुणाला खिळून होते. त्यात त्यांना मूत्रपिंडांचा त्रास सुरू होता. अखेर वृद्धापकाळात शरीराने साथ सोडल्याने त्यांची प्राणज्योत मालवली आणि आणखी एक संगीतसम्राट पंचतत्त्वात विलीन झाला.
Thursday, 17 September 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment