Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 13 September 2009

"अस्तित्वा'साठी मिकी - ज्योकिम एकत्र

मडगाव, दि. १२ (प्रतिनिधी): मुख्यमंत्री दिगंबर कामत सरकारच्या मंत्रिमंडळावर सासष्टी तालुक्याचा पगडा असल्याने इथे राजकीय दृष्ट्या एखादी घटना घडली की त्याचा थेट परिणाम सरकारवर पडतो. कॉंग्रेस पक्षाचे प्रभारी बी. के. हरिप्रसाद तथा राजीव शुक्ला यांच्या अलीकडच्या गोवा भेटीत मंत्रिमंडळ फेररचनेबाबत गंभीर चर्चा झाली होती. या चर्चेअंती नगरविकासमंत्री ज्योकिम आलेमाव व पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांना नारळ देण्याचा घाट घातला गेला, असा सुगावा लागल्याने आता या नेत्यांनी आपापसातील मतभेद चार हात दूर ठेवून एकमेकांच्या मदतीला धावण्याचा संकल्प सोडला आहे. आलेमावबंधू व मिकी पाशेको यांचा मंत्रिमंडळ फेररचनेवेळी विचार करण्याचे धाडस मुख्यमंत्री कामत यांनी करू नये, असा अप्रत्यक्ष राजकीय संदेश त्यांनी या सलोख्यातून पाठवला आहे. सासष्टी तालुक्याचे "बिग बॉस' आलेमावबंधू व त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी समजले जाणारे पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांच्यात निर्माण झालेल्या नव्या आणि अभूतपूर्व सलोख्याच्या वृत्ताने सध्या या भागात एकच खळबळ उडाली आहे.
राजकारणात कोण कोणाचा शत्रू वा कोण कोणाचा मित्र नसतो तरीही स्वार्थासाठी कोण कोणाच्या जवळ येईल हे मात्र सांगता येत नाही. वार्का येथील आलेमाव बंधू व बेतालभाटी येथील मिकी पाशेको यांच्यातील राजकीय वैर तर सर्वश्रुत आहे. परंतु, आकाशात सूर्यावर येणारे तात्कालिक ढग जसे दूर होतात त्याच पद्धतीने आता या नेत्यांमधील वैरही दूर झाले असून त्यांच्यात मैत्रीचे एक नवे पर्व सुरू झाले आहे. प्राप्त माहितीनुसार काल रात्री नगरविकास मंत्री ज्योकिम आलेमाव व पर्यटन मंत्री मिकी पाशेको यांची ज्योकिम आलेमाव यांच्या मडगाव येथील खासगी कचेरीत सुमारे दोन तास बैठक झाली व या बैठकीत अनेक राजकीय खलबते झाल्याचे समजते.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपूर्वी एकमेकांचे जानी दोस्त असलेले आलेमावबंधू व मिकी यांच्यात काही काळापूर्वी राजकीय मतभेद निर्माण झाले होते, या मतभेदांचे पर्यवसान राजकीय वैरात परिवर्तित झाले होते. पाझरखणी येथे होऊ घातलेल्या फुटबॉल अकादमीच्या वादानंतर हे वैर जाहीरपणे समोर आले होते. आता ज्योकिम आलेमाव यांना या नव्या सलोख्याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी बैठक झाल्याचे मान्य केले. मिकी पाशेको यांनीही या वृत्ताला दुजोरा देत आपण व ज्योकिम हे मंत्रिमंडळातील सहकारी आहोत, त्यामुळे राज्याच्या विकासाच्या योजना व चर्चा करण्यासाठी आम्ही एकत्र जमलो होतो, असे परिपक्व उत्तर दिले. राज्याच्या विकासासाठी शत्रुत्व दूर करणे हे हितावह असते असेही बोल मिकी यांच्याकडून ऐकायला मिळाले.
दरम्यान, मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत सध्या राजकीय पटलावर हालचाली सुरू आहेत. मंत्रिमंडळातील एका मंत्र्याला काढून त्याजागी पांडुरंग मडकईकर यांची फेरवर्णी लावण्याची बोलणी झाली होती तसेच दुसऱ्या बाजूने एका गटाने उपसभापती माविन गुदिन्हो यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेण्यासंबंधीही बोलणी केली होती, असे वृत्त सूत्रांनी दिले. सांताक्रुझच्या एकमेव महिला आमदार व्हिक्टोरीया फर्नांडिस यांना उपसभापतिपद देण्याचेही ठरले होते. मिकी पाशेको यांनी चर्चिल आलेमाव यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका सभापतींकडे दाखल केलेली आहे. ही याचिका मागे घ्यावी व ज्योकिम आलेमाव यांना मंत्रिमंडळातून काढून टाकू नये यासाठी मनधरणी करण्यासाठी ही प्राथमिक बैठक असावी असे बोलले जाते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक गट सध्या मिकी पाशेको यांना काढून त्याजागी नीळकंठ हळर्णकर यांची मंत्रिपदी वर्णी लागावी, यासाठी प्रयत्नशील आहे. या दोन्ही प्रकरणातून आलेमावबंधू व मिकी पाशेको यांनी एकत्र येण्याचे ठरविले आहे. याबाबत त्यांनी अन्य नेत्यांचाही पाठिंबा मिळवण्याचे ठरवले आहे. अन्य पाच आमदार व मंत्र्याचा आपल्याला पाठिंबा आहे, असा दावाही आता त्यांनी करायला सुरुवात केली आहे. मिकी पाशेको यांची व कुडचडेचे आमदार श्याम सातार्डेकर यांची जवळीक तर परिचितच आहे. केपेचे आमदार चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांना मंत्रिपद हवे आहे त्यासाठी ते देखील या गटाच्या गळाला लागल्याचे वृत्त आहे. आज ज्योकिम आलेमाव, मिकी यांच्यासह आणखी पाच नेत्यांची बैठक झाल्याचेही वृत्त पसरले होते. दरम्यान, या गटातील एकादेखील मंत्र्यावर गंडांतर आणण्याचा प्रयत्न झाल्यास मुख्यमंत्री कामत यांच्यासाठी ते जड जाईल, अशी अप्रत्यक्ष धमकीच या नव्या समीकरणाद्वारे त्यांनी दिली आहे.

No comments: