Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 15 September 2009

हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची नव्या वाहनांनाही सक्ती नाही

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) - हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसंदर्भात राज्य सरकारचा पुढील ठोस निर्णय होत नाही तोवर नव्या वाहनांना ही नंबरप्लेट सक्तीची करू नये, असे तोंडी आदेश सर्व "शोरूम'ना देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे गेल्या काही महिन्यांत नवीन वाहन खरेदी केलेल्या ग्राहकांनी या नंबरप्लेटसाठी जमा केलेले पैसेही परत करण्याचे आदेश वाहतूक खात्याला देण्यात आले असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली. तसेच ज्या ग्राहकांनी ऑनलाइन पद्धतीने पैसे भरले आहेत, त्यांचेही पैसे परत केले जाणार आहेत.
बस वाहतूक मालक संघटना तसेच भारतीय जनता पक्षाच्या प्रचंड दबावानंतर राज्य सरकारला हाय सिक्युरिटी नंबरप्लेटचा प्रस्ताव स्थगित ठेवावा लागला आहे. हा प्रस्ताव म्हणजे प्रचंड घोटाळा असून तो त्वरित रद्द करण्याची मागणी विधानसभेत विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली होती. त्याचप्रमाणे "गोवा बंद'चा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी श्रीवास्तव समितीची स्थापना करून या प्रस्तावाला स्थगिती दिली होती. तसेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ठोस निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार श्रीवास्तव समितीचा अहवाल येईपर्यंत नंबरप्लेटची सक्ती वाहतूक खात्याने करू नये, अशी सूचना करण्यात आली आहे.
दरम्यान, कर्नाटक सरकारने आपल्या राज्यात हाय सिक्युरिटी नंबरप्लेट सक्तीची करण्याचा निर्णय घेतला असून सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कर्नाटकातही या नंबरप्लेट पुरवण्याचे कंत्राट गोव्यात वादग्रस्त ठरलेल्या सिम्नित कंपनीलाच देण्यात आली आहे, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकार हा प्रश्न कशा पद्धतीने हाताळतात, तेथे कोणाचा विरोध होते, यावर गोवा सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. कर्नाटक सरकार हाय सिक्युरिटी नंबरप्लेट सक्तीचा करण्याची अधिसूचना येत्या आठवड्यात जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यानंतरच गोवा सरकार गोव्यातही ही नंबरप्लेट सक्तीचा करण्याबाबत ठोस निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
हाय सिक्युरिटी नंबरप्लेटला गोव्यात प्रचंड विरोध झाल्यानंतर सरकारने या हा प्रस्ताव स्थगित ठेवून या नंबरप्लेट बसवण्याचा निर्णय ऐच्छिक केला होता. त्यामुळे ज्यांना ही नंबर प्लेट बसवायची त्यांना तशी मोकळीक देण्यात आली आहे. तथापि, ज्यांनी पैसे भरले आहेत आणि ज्यांना ही नंबरप्लेट बसवायची नाही, अशांना त्यांचे पैसे परत दिले जाणार आहेत.

No comments: