अमेरिकेचा सावधगिरीचा सल्ला
वॉशिंग्टन, दि. १३ - चालू व पुढील महिन्यात भारतात ईद, दसरा व दिवाळी हे सण येत असल्याने देशातील काही भागांत अतिरेकी हल्ले घडवून आणण्याची शक्यता अमेरिकेने व्यक्त केली असून, तसा सावधगिरीचा इशारा दिला आहे.
या काळात भारत दौऱ्यावर जाणाऱ्या, तसेच गेलेल्या अमेरिकन नागरिकांनाही प्रवास करताना सांभाळून राहण्याचा सल्ला दिला आहे. चालू व पुढील महिन्यात भारतात सणासुदीचे दिवस असल्याने अतिरेकी याच काळात हल्ले करण्याची शक्यता आहे. मुंबईतील नोव्हेंबर २००८ च्या हल्ल्याचा (ज्यात काही अमेरिकन नागरिकही ठार झाले होते) उल्लेख करून अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हल्ल्यांसाठी अतिरेकी हॉटेल्स व इतर सार्वजनिक जागांचीच प्रामुख्याने निवड करत असतात याकडे लक्ष वेधून या काळात भारत दौऱ्यावर असलेल्या अमेरिकन नागरिकांनी त्यासंदर्भात योग्य ती काळजी घ्यावी, असे या निवेदनात पुढे म्हटले आहे.
आपल्या नागरिकांना सावधगिरीची सूचना देताना अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, बाहेर पडताना स्थानिक वृत्तपत्रांवर नजर टाकीत जा, तसेच ज्या ठिकाणी आपण जात आहोत तेथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था आहे की नाही याची खात्री करून घेत जा.यात सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक ठिकाणे व मनोरंजनाची ठिकाणे याकडे विशेषकरून लक्ष द्यावे. या सावधगिरीच्या सूचनांचे पालन ३० ऑक्टोबरपर्यंत करावे, असे शेवटी म्हटले आहे.
Monday, 14 September 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment