Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 16 September 2009

दिल्ली पाठोपाठ आता मुंबईतही गोवा विक्रीस

१८ पासून मेळाव्याचे आयोजन
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व किंवा अस्मितेच्या बाता या केवळ निवडणुकीत स्थानिक लोकांची मते मिळवण्यासाठीच असतात. प्रत्यक्षात मात्र आपली ही भूमी बडे बिल्डर व रियल इस्टेटवाल्यांच्या घशात जात आहे, याकडे कुणाचेच लक्ष राहिलेले नाही. राज्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जिथे विशेष राज्याचा दर्जा मिळवण्याच्या गोष्टी सुरू आहेत, त्याच गोव्याचा दुसऱ्या बाजूने जाहीर लिलावही सुरू आहे. गेल्या मार्च २००८ साली दिल्ली येथे भरवण्यात आलेल्या कथित गोव्यातील जमिनींच्या खरेदी-विक्री मेळाव्यानंतर आता मुंबई येथे असाच मेळावा १८ ते २० सप्टेंबर रोजी "मॅजीकब्रीक्स प्रॉपर्टी बाझार २००९ गोवा' या नावाने भरवण्यात येत आहे. या मेळाव्याची जोरदार जाहिरात मुंबईतील नामांकित वृत्तपत्रांतून सुरू असून त्यात राज्यातील अनेक प्रमुख ठिकाणांची स्थळे विक्रीला असतील, असे सांगण्यात येत आहे.
वादग्रस्त प्रादेशिक विकास आराखडा, विशेष आर्थिक विभाग (सेझ), मेगा प्रकल्प व अलीकडे बराच गाजलेला किनारी व्यवस्थापन विभाग कायदा आदींमुळे आपल्या या निसर्गसुंदर व दैवी देणगी प्राप्त झालेल्या गोव्याची अस्मिता धोक्यात येईल, यामुळे या विरोधात जागृत गोमंतकीयांनी रान उठवले होते. एवढे असूनही गोव्यातील मोठ्या प्रमाणातील जमिनींची विक्री मात्र काही केल्या थांबलेली नसल्याचेच या प्रकरणावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. वरळी-मुंबई येथील नेहरू सेंटर हा प्रॉपर्टी बाजार भरवण्यात येणार आहे." गोव्यातील तुमच्या स्वप्नातलं घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी ' या घोषणेने या मेळाव्याची जाहिरात सुरू आहे. आयोजकांनी जाहीर केल्याप्रमाणे गोव्यातील महत्त्वाच्या ठिकाणी समुद्र किनाऱ्याचे दर्शन घेता येईल अशी अपार्टमेंट्स, छोटे बंगले, घरे इत्यादी या मेळाव्यात खरेदी- विक्रीसाठी उपलब्ध असतील. या जाहिरातीत दिलेल्या ठिकाणांत हडफडे, बागा, फोंडा, करंझाळे, आसगांव, बादे, बार्देश, सांगोल्डा, पर्रा, कोलवा किनारा, नागवा, वेर्णा आदी ठिकाणांसाठी कोट्यवधींच्या बोली लावल्या जाणार आहेत.
दरम्यान, गेल्या वेळेस १५ व १६ मार्च २००८ रोजी तिवोली गार्डन्स, चत्तरपूर रोड, नवी दिल्ली येथे "टाइम्स बिझिनेस सोल्यूशन्स लिमिटेड' या एका वृत्तसमूहाशी संबंधित कंपनीकडून मेळाव्याचे आयोजन केले होते. या भव्य मेळाव्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील फॅशन डिझायनर तथा गोव्याचे सुपुत्र व्हॅन्डल रॉड्रिगीस यांना खास अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता पण गोव्याच्या अस्मितेबाबत व अस्तित्वाबाबत नेहमीच संवेदनशील असलेल्या व्हॅन्डल यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला व त्याचबरोबर या प्रकाराविरोधात जाहीर वाच्यता करून आपली नाराजीही व्यक्त केली होती. गोव्याची विक्री करण्याचे असले प्रयत्न जागृत गोमंतकीयांनी हाणून पाडावेत, अशी मागणीही त्यांनी केली होती.
दिल्ली येथे भरवण्यात आलेल्या मेळाव्याला दोन दिवसांत सुमारे तीन हजार लोकांनी गोव्यात जागा घेण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती असा दावा त्यावेळी आयोजकांनी केला होता. या मेळाव्यात सुमारे ३२ प्रकल्पांची विक्री झाल्याचेही सांगण्यात आले होते. या मेळाव्यात सहभागी झालेल्या विविध रियल इस्टेट कंपनींकडून सुमारे ८०० हुन जास्त लोकांकडून घरे, फ्लॅट व जागांच्या खरेदीसाठी नोंदणी झाल्याचीही माहिती देण्यात आली होती.
गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असल्याने व त्यात गोवा हे शांत व सुरक्षित ठिकाण अशी दृढ समजूत असल्याने रियल इस्टेटवाल्यांकडून इथे बड्या प्रकल्पांच्या योजना आहेत. याठिकाणी जमिनींचे भाव एवढे वाढले आहेत की स्थानिक लोकांना आपल्याच प्रदेशात जमीन खरेदी करणेही परवडणारे नाही. राज्यातील जमिनींच्या सुरक्षेखातरच गोव्याला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, अशी मागणी होते आहे. आपले काही राज्यकर्तेच या व्यवसायात एजंटगिरी करीत असल्याने या प्रकाराला रोखणे कठीण आहे,असाही आरोप अनेक सामाजिक संस्थांकडून होत आहे. मुंबईत ज्याप्रकारे मूळ मुंबईकर हरवलेला आहे, त्याच प्रकारे आता "गोयंकार' हरवण्यासही वेळ लागणार नाही,अशी प्रतिक्रियाही अनेकांनी व्यक्त केली.

No comments: