Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 19 September 2009

हा तर माझ्याविरोधात कॉंग्रेसचा कट - मिकी

खंडणीप्रकरणी तक्रारीला उग्र स्वरूप

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) - खंडणीची मागणी केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आपल्याविरोधात नोंदवून घेतलेली तक्रार हा आपल्याच सरकारातील काही नेत्यांचा डाव आहे. राष्ट्रवादी पक्षाचा मंत्री खंडणी मागतो व जीवे मारण्याची धमकी देतो असे भासवून आपले आणि पर्यायाने आपल्या पक्षाचे नाव राष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्याचा हा कॉंग्रेसचा कट असल्याचा आरोप पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी केला.
महाराष्ट्रातील ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण उकरून काढून तिथे राष्ट्रवादीला कमी लेखण्याचा हा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.आपण व आलेमाव बंधू एकत्र आल्याने सरकारमधील काही नेत्यांचे धाबे दणाणले आहे. मिकी व चर्चिल यांचे वैर कायम राहावे अशी काही नेत्यांची तीव्र इच्छा होती. मात्र आता हे वैर संपल्याने मिकी व आलेमाव बंधू काहीही करू शकतात, या भीतीनेच आपल्याला लक्ष्य बनवण्याचे प्रयत्न होत आहेत. पोलिस तक्रारीबाबत आपण आपल्या कायदाविषयक सल्लागारांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, अशी माहिती त्यांनी दिली.
पुराव्यानंतरच अटकेची शक्यता
दरम्यान, पाशेको यांच्याविरोधातील तक्रार नोंद करून घेतल्यानंतर आता या तक्रारीची सखोल चौकशी होईल, अशी माहिती गुन्हा अन्वेषण विभागाचे उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर यांनी दिली.याप्रकरणी मंत्र्यांना अटक होऊ शकते काय, असे विचारले असता त्यासाठी आवश्यक पुरावे गोळा करणे गरजेचे आहे. ते हाती आल्यानंतरच पुढे विचार होऊ शकतो, असे संकेत त्यांनी दिले.

No comments: