राजकीय घडामोडींशी संबंध?
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) - पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी ३ लाख ६९ हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करून त्यांच्याविरोधात एका कॅसिनो चालकाने चार महिन्यांपूर्वी दाखल केलेली तक्रार आज अचानकपणे गुन्हा अन्वेषण विभागाने नोंद करून घेतल्याने राजकीय गोटात एकच खळबळ उडाली. आलेमांवबंधु व मिकी यांची अलीकडेच झालेली दिलजमाई व त्यांच्याकडून होणारी वक्तव्ये यामुळे सरकाराअंतर्गतच अस्वस्थता पसरली होती. आता सरकारकडूनच याप्रकरणी मिकीविरोधातील या प्रकरणाचा वचपा काढून त्यांचे पंख छाटण्याचा हा नवा डाव आखण्यात आल्याचे राजकीय गोटात बोलले जात आहे.
याप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने दिलेल्या माहितीनुसार मिकी व अन्य अकरा जणांविरुद्ध भा.द.स १४१, १४२, १४३, ३८४, ५०६ व ४५३ कलमानुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील काही कलमे दखलपात्र असल्याने मिकी यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे. माजोर्डा येथील एका कॅसिनोत घुसून मंत्री पाशेको यांनी धमकी तसेच खंडणी मागितल्याची पोलिस तक्रार होंडा सत्तरी येथे राहणारे कॅसिनोचे व्यवस्थापक महेश राव यांनी गेल्या चार महिन्यापूर्वी केली होती. ३० व ३१ मे च्या मध्यरात्री मंत्री मिकी पाशेको यांच्यासह अन्य अकरा जणांनी या कॅसिनोत घुसून खंडणी मागितल्याचे तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे,अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी याप्रकरणातील प्राथमिक चौकशी करून आज या प्रकरणी अधिकृतरीत्या गुन्हा नोंद केला आहे. सुरुवातीला या विषयीची पोलिस तक्रार कोलवा पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली होती पण नंतर हे प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आले होते.
दरम्यान, मिकी यांनीही सदर कॅसिनो व्यवस्थापनाविरोधात फसवणुकीची तक्रार नोंद केली होती. आपण कॅसिनोत जिंकलेले पैसे आपल्याला दिले नाहीत वरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. माजोर्डा बीच रिसॉर्टच्या कॅसिनोत आपल्याला १.२५ कोटी रुपये जिंकलेले असताना ते देण्यात आले नाहीत, असा दावा त्यांनी या तक्रारीत केला होता. याविषयीचा अधिक तपास गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार वस्त करीत आहेत.
Friday, 18 September 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment