मडगाव, दि. १३ (प्रतिनिधी) : पर्यटनमंत्री मिकी पाशेको व नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमांव हे परंपरागत राजकीय वैरी स्वतःचे राजकीय भवितव्य शाबूत ठेवण्यासाठी एकत्र आलेले असले तरी त्यांचे हे ऐक्य प्रामुख्याने मुख्यमंत्री दिगंबर कामत व दोन्ही कॉंग्रेस पक्षांच्या मुळावर येण्याची चिन्हे दिसत आहेत. या नव्या राजकीय समीकरणामुळे मंत्र्यांचे प्रगतिपुस्तक पाहून मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा प्रस्ताव बारगळल्यात जमा झाला आहे, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
दोन आठवड्यांपूर्वी कॉंग्रेस पक्षाचे निरीक्षक बी.के.हरिप्रसाद व राजीव शुक्ला येऊन गेल्यावर राज्यात ज्या राजकीय हालचाली सुरू झाल्या होत्या त्याचा फायदा राष्ट्रवादीतील मिकी विरोधकांनी उठवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींकडे मिकीविरुद्ध तक्रार करून त्यांना मंत्रिमंडळातून वगळावे व त्यांच्या जागी पक्षाचे अन्य आमदार नीळकंठ हळर्णकर यांची वर्णी लावावी अशीही जोरदार लॉबिंग झाले होते. मिकी यांच्याविरोधातील अनेक तक्रारी व आपल्याच सरकारविरोधात जाहीरपणे सुरू केलेली वक्तव्यबाजी यामुळे दिल्लीतूनही मिकी यांना हटवण्याचे स्पष्ट संकेत मिळाले होते,अशीही चर्चा सुरू होती. मिकी यांच्या हाती नारळ देऊन दुसरीकडे कॉंग्रेस पक्षातर्फे ज्योेकीम यांचे मंत्रिपद काढून आलेमावबंधु व मिकी यांचे सासष्टीतील बळ मोडून काढण्याची रणनीती आखण्यात येत होती. सरकाराअंतर्गत या गोष्टींची चाहूल लागल्याने वेळीच आपापसातील वैर दूर ठेवून एकत्र येण्याचा निर्णय या नेत्यांनी घेतला व त्यांच्यात समेटही झाला, त्यामुळे मंत्रिमंडळ फेररचनेचा डाव प्रथमदर्शनी तरी फसला आहे, असे दिसून येते. कॉंग्रेस पक्षातीलच नेत्यांकडून आलेमांवबंधुविरोधात कटकारस्थान रचले जात असल्याचा जाहीर आरोप ज्योकीम आलेमाव यांनी केला असून या नेत्यांना अजिबात डोके वर काढू दिले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिली.
दरम्यान, या बदललेल्या राजकीय समीकरणामुळे एकंदर मंत्रिमंडळावर असलेला सासष्टीचा वरचष्मा केवळ वाढलेला नाही तर मंत्रिमंडळ संपूर्णतः सासष्टीच्या कह्यात गेल्या सारखे झाले आहे. यापुढे चर्चिलबंधू सांगतील तीच पूर्व असा प्रकार घडण्याची दाट शक्यता असून ही नवी भाऊबंदकी मुख्यमंत्र्यांसाठी मात्र डोकेदुखी ठरण्याचीच जास्त शक्यता आहे. उत्तर गोव्यात आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचा दबाव तर दक्षिणेत आता या नव्या गटाचा दबाव यामुळे मुख्यमंत्र्यांचा कोंडमारा होणार,अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घडामोडीमुळे उत्तर गोव्याला मंत्रिमंडळात आणखी प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता सध्या तरी दुरावली आहे.
आजवर चर्चिल व मिकी यांची आपापसात झगडी लावून मजा पाहणाऱ्यांची मात्र या नव्या दिलजमाईमुळे गोची होण्याची शक्यता आहे. पर्यटनमंत्र्यांनी चर्चिल व रेजिनाल्ड यांच्याविरुद्ध सभापतींकडे दाखल केलेली अपात्रता याचिकाही मागे घेतली जाणार असेही स्पष्ट संकेत मिळाले आहेत. नावेलीचे एकेकाळचे अनभिषिक्त सम्राट गणले जाणारे लुईझिन फालेरो यांच्याविरुद्ध चर्चिल-मिकी यांनी मोहीम उघडली तर ती सुध्दा सत्ताधाऱ्यांसाठीच अडचणीची ठरणार आहे.
चर्चिल यांचे उपद्रवमूल्य किती जबर आहे याचा अनुभव कॉंग्रेसने आजवर वेळोवेळी घेतलेला आहे व गत लोकसभा निवडणुकीतही त्याचा प्रत्यय पक्षाला आलेला आहे. मडगावसह सासष्टीतील कितीतरी मतदारसंघातील निवडणुकीचा कल बदलण्याची ताकत या व्यक्तीकडे आहे. आता मिकीची साथ व त्याचबरोबरच कॉंग्रेसकडून गेल्या दोन अडीच वर्षांत या ना त्या कारणावरून दुखावले गेलेल्यांची फूस मिळाली तर ती कॉंग्रेससाठी डोकेदुखी ठरेल व खुद्द मडगावात त्याचा परिणाम जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिकी यांनी आलेमांव बंधूबरोबर हातमिळवणी करण्यामागे मतदारसंघ फेररचनेचेही एक कारण आहे असे सांगितले जाते. नवीन रचनेत वीजमंत्र्यांच्या लोटली मतदारसंघातील नुवेचा भाग बराचसा बाणावलींत आलेला आहे व तेथे टक्कर देण्यासाठी त्यांना आलेमांव बंधूंची मदत हवी आहे. पर्याावरणमंत्री या नात्याने आलेक्स सिकेरा यांनी ज्या तेरा खाणीचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत त्यात ज्योकिम यांचीही एक खाण असून त्यामुळे ते सिक्वेरांवर डूख धरून आहेत. या परिस्थितीचा नेमका लाभ मिकी यांनी या प्रकरणातून उठवण्याची खेळी केल्याचीही चर्चा आहे. आता या नव्या समीकरणातून नेमका कुणाचा किती फायदा होणार हे पाहावे लागेल.
Monday, 14 September 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment