ज्योकिम-मिकी दिलजमाईची परिणती
मडगाव, दि.१५ (प्रमोद ल.प्रभुगावकर): नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमांव व पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांच्यातील दिलजमाईमुळे पांझरखण फुटबॉल अकादमीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ही फुटबॉल अकादमी गोव्यासाठी अत्यंत गरजेची आहे असे आपले ठाम मत आहे व त्यामुळे आपण याप्रकरणी आपले मित्र तथा पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांच्याशी चर्चा करू, अशी माहिती ज्योकीम आलेमांव यांनी पणजी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. मिकी यांनी आपल्या प्रस्तावास होकार दिल्यास नव्याने "भारती फुटबॉल अकादमी' ला प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
कुंकळ्ळीचे आमदार असलेल्या नगरविकासमंत्री ज्योकीम यांनी या अकादमीसाठी पूर्वी विशेष रस घेतला होता व केवळ त्याच कारणासाठी त्यांनी गृहनिर्माण मंडळाच्या मालकीच्या जागेचा प्रस्ताव ठेवला होता. ज्योकीम आलेमांव यांच्या या प्रस्तावाला जोरदार विरोध करून या जागेवर सदर अकादमी होऊ न देण्याचा चंगच ते खाते सांभाळणारे मिकी पाशेको यांनी बांधला. मिकींच्या या भूमिकेला स्थानिक लोकांनीही पाठिंबा दिल्याने अखेर "भारती एअरटेलने' माघार घेत हा प्रस्तावच सोडून दिला होता. या नियोजित अकादमीसाठी सरकारने गृहनिर्माण वसाहतीसाठी संपादन केलेली १.२६ लाख चौ. मी. जागा हस्तांतरित करण्याचे ठरविले होते. एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या या नेत्यांतील वितुष्टामुळे हा प्रकल्प अडकला होता. मिकी यांनी मुख्यमंत्री व खुद्द मंत्रिमंडळालाही न जुमानता या जमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव अडवून ठेवला व त्याचीच परिणती म्हणून भारती एअरटेलने या प्रकल्पाचा नाद सोडून दिला.
केवळ ज्योकीम आलेमांव यांच्याविरुद्ध वैयक्तिक हेवा असल्यानेच मिकी यांनी या अकादमीला विरोध केला होता हे नंतर उघड झाले कारण संपादन केलेली सदर जमीन परत मिळावी यासाठी मूळ मालकांनी बरेच प्रयत्न केले होते पण त्यांच्या या मागणीकडे सरकारने अजिबात लक्ष दिले नाही. आता हा विषय नव्याने उपस्थित झाल्यास ते जमीन मालक पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सरकारने गृहनिर्माण मंडळासाठी बळजबरीने ही जमीन संपादन केली होती व त्यावेळीच सर्वांनी त्याला विरोध केला होता. दरम्यान, गृहनिर्माण मंडळाची ती जमीन सुडाकडे हस्तांतरित करून त्यामार्फत भारती मित्तलांकडे ती सुपूर्द करावयाचा घाट घातला जात असल्याचा व फुटबॉल अकादमी ही केवळ नावालाच असून तिथे प्रत्यक्षात तारांकित हॉटेल येणार असल्याचा आरोप या लोकांनी केला होता.
हरयाणातही अकादमीला स्थगिती
मिकी-ज्योकीम यांच्यातील वादामुळे गोव्यातून हात हलवत परत जाणे भाग पडलेल्या भारती एअरटेल फुटबॉल अकादमीला हरयाणा सरकारने हिरवा कंदील दाखवला होता पण तिथेही आता काही कारणांस्तव हा प्रस्ताव भूसंपादनाच्या निमित्ताने अडकल्याची माहिती मिळाली आहे. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष तथा केंद्रीय विमान वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी काही दिवसांपूर्वी ही माहिती एका वृत्तसंस्थेला दिली होती. गोव्यातून माघार घ्यावी लागल्याने या अकादमीला सुरुवातीस पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन हरयाणा सरकारने दिले होते पण तिथेही काही अडचण निर्माण झाल्याने अकादमीसाठी जागा संपादन करण्यात हरयाणा सरकारला अपयश आल्याचेही श्री. पटेल यांनी म्हटले आहे. दरम्यान, भारती एअरटेल कंपनीला हा प्रस्ताव निकालात काढू नये,अशी विनंती आपण केल्याचे श्री.पटेल यांनी सांगितले आहे.
मिकी व ज्योकीम आलेमांव यांच्यातील चर्चा यशस्वी झाल्यास व गोवा फुटबॉल संघटनेकडून पुन्हा एकदा भारतीय फुटबॉल संघटनेकडे हा प्रस्ताव गेल्यास ही अकादमी गोव्यात स्थापन होण्यास अधिक वाव आहे व त्यामुळे ज्योकीम यांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत,अशी माहितीही प्राप्त झाली आहे.
Wednesday, 16 September 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment