Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 16 September 2009

भक्तीला रौप्यपदक

पणजी, दि. १५ (क्रीडा प्रतिनिधी): गोव्याची नामांकित बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी हिने आपल्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवताना नागपुरात आज पार पडलेल्या राष्ट्रीय "ब' गट महिला बुद्धिबळ स्पर्धेत रौप्यपदक पटकावले.
नागपूरमधील श्री अग्रसेन भवनात झालेल्या या स्पर्धेत भक्तीने शेवटच्या म्हणजेच अकराव्या फेरीत आंध्र प्रदेशच्या लक्ष्मी साहिती हिला पराभूत केले. या विजयाबरोबरच भक्तीनेे अकराव्या फेरीअंती ९.५ गुणांची कमाई करून रौप्यपदकावर आपला हक्क सांगितला. विशेष म्हणजे लक्ष्मी साहितीने या पराभवानंतरही सुवर्णपदक जिंकले ते अकरा सामन्यांतून १० गुण कमावून. या पदकासह भक्तीने ३५ एलो गुणांची कमाई केली. त्यामुळे ती राष्ट्रीय "अ' गट महिला बुध्दिबळ स्पर्धेसाठी ती तिसऱ्यांदा पात्र ठरली आहे.
विजेत्या लक्ष्मी साहितीला रोख ३० हजार रुपयेव चषक आणि भक्तीला रोख २२ हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. या यशाबद्दल गोवा बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष आशिष केणी, सचिव अरविंद म्हामल, खजिनदार किशोर बांदेकर तसेच असोसिएशनच्या इतर सर्व अधिकाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे. भक्तीखेरीज गोव्याच्या रिया सावंतने ५.५ गुणांसह ५१ वे स्थान पटकावले. शेवटच्या फेरीत प्रतिस्पर्धी खेळाडू जयश्री संकपाळ स्पर्धास्थळी न फिरकल्याने तिला पुढे चाल देण्यात आली. गौरी हडकोणकरने बिधर रितंबरा हिच्याविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवला. गौरीला ५ गुणांसह ६३वे स्थान मिळाले. मध्य प्रदेशच्या कुशावह आस्थाकडून पराभव स्वीकारावा लागल्याने दीपिका गिरीधर हिला ४ गुणांसह ७८व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

No comments: