गोव्यातील निवडणूक कार्यक्रम आचारसंहिता लागू : २ मार्चपासून
२८ मार्च रोजी अधिसूचना काढणार
उमेदवारी सादर करण्याची अंतिम तारीख ४ एप्रिल
उमेदवारी अर्जांची छाननी ः ६ एप्रिल
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ः ८ एप्रिल
मतदान : २३ एप्रिल
मतमोजणी : १६ मे २००९
...................................
..१६ एप्रिलपासून ते १३ मेपर्यंत पाच टप्प्यांत मतदान
..देशभर १६ मे रोजी मतमोजणी
..याच काळात तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका
नवी दिल्ली, दि. २ : पंधराव्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून १६ एप्रिलला मतदानाला प्रारंभ होत असून या निवडणुका पाच टप्प्यांत होणार आहेत. पहिला टप्पा १६ एप्रिल, दुसरा २३ एप्रिल, तिसरा ३० एप्रिल, चौथा ७ मे व पाचवा आणि अंतिम टप्पा १३ मे रोजी होणार आहे. गोव्यातील दोन्ही मतदारसंघांत २३ रोजी मतदान होईल.
मतदानाची मतमोजणी १६ मे रोजी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी आज दिल्लीत निवडणूक आयुक्त कार्यालयात आयोजित एका पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीबरोबरच ओरिसा, सिक्कीम व आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुका होतील.याशिवाय याच काळात सात राज्यांतील विधानसभेच्या पोटनिवडणुकाही घेतल्या जाणार आहेत.
१४ व्या लोकसभेची मुदत एक जूनला संपणार असल्याने पुढील लोकसभा २ जूनपूर्वी स्थापन होणे आवश्यक असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त गोपालस्वामी यांनी सांगितले. निवडणुकीच्या घोषणेनंतर आता संपूर्ण देशात निवडणूक आचारसंहिता तात्काळ लागू करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकारपरिषदेला गोपालस्वामी यांच्यासोबतच निवडणूक आयुक्त नवीन चावला व एस. वाय. कुरैशी हेही उपस्थित होते.
जम्मू-काश्मीर आणि उत्तर प्रदेशात पाच टप्प्यांत, बिहारमध्ये चार टप्प्यांत, महाराष्ट्र आणि पं. बंगालमध्ये तीन टप्प्यांत मतदान होईल. आसाम, झारखंड, मणिपूर, आंध्र प्रदेश, पंजाब, ओरिसा, कर्नाटक व मध्यप्रदेशात दोन टप्प्यांत आणि केंद्रशासित प्रदेशातील उर्वरित १५ जागांसाठी एका टप्प्यांत मतदान होणार आहे. या मतदानाची मतमोजणी १६ मे रोजी होणार असून याच दिवशी संपूर्ण देशातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
लोकसभेच्या १२४ जागांसाठी १६ एप्रिलला, १४१ जागांसाठी २३ एप्रिलला, १०७ जागांसाठी ३० एप्रिलला, ८५ जागांसाठी ७ मे रोजी तर ८६ जागांसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये २३ एप्रिलऐवजी २२ एप्रिलला मतदान घेण्यात येणार आहे. कारण २३ एप्रिलला मणिपूरमध्ये स्थानिक सुटी आली असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
निवडणुकीच्या काळात धनशक्तीचा जो वापर केला जातो त्याची निवडणूक आयुक्तांनी गंभीरतेने दखल घेतली असून सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांना निर्धारित करून देण्यात आलेल्या रकमेपेक्षा अधिक खर्च न करण्याचा सल्ला दिला आहे. निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब व त्याचे विवरण उमेदवाराने निवडणूक आयोगाला देणे बंधनकारक आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
निवडणूक कार्यक्रमाला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी सर्व राजकीय पक्ष, सर्व राज्यांचे मुख्य सचिव व सरकारी संस्थांशी विचारविनिमय करण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सोबतच या काळात विविध राज्यांत घेण्यात येणाऱ्या केंद्रीय तसेच राज्यस्तरीय परीक्षा, त्यांचा कार्यकाळ व सुट्या यांचाही निवडणूक कार्यक्रम निश्चित करताना विचार करण्यात आला आहे. देशातील मतदारसंघांची पुर्नर्बांधणी करण्यात आल्यानंतर लोकसभेच्या निवडणुका प्रथमच घेण्यात येत आहेत. लोकसभेच्या एकूण ५४३ मतदार संघांपैकी ४९९ मतदारसंघांची पुर्नर्बांधणी करण्यात आलेली आहे.
निवडणुकीच्या काळात सुरक्षा तसेच प्रशासकीय कामासाठी जवळपास ४० लाख सरकारी कर्मचाऱ्यांची सेवा घेतली जाणार आहे. यावेळच्या निवडणुकीत देशातील ७१ कोटीपेक्षा अधिक मतदार मतदानात भाग घेतील, असे सांगून मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी सांगितले की, मागच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळच्या निवडणुकीत चार कोटी ३०लाख मतदार वाढलेले आहेत. याचबरोबर लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ५२२ जागांसाठी निवडणूक ओळखपत्र आवश्यक करण्यात आले आहे. कारण या भागात ओळखपत्रे वाटण्यात आलेली आहेत. निवडणुका निष्पक्ष व खुल्या वातावरणात व्हाव्यात यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून तसेच निवडणूक आचारसंहिता तात्काळ लागू करण्यात आली आहे.
--------------------------------------------------------------------------
जम्मू-काश्मीर व उत्तरप्रदेशात पाच टप्पे
बिहारमध्ये चार टप्पे
महाराष्ट्र आणि प. बंगाल तीन टप्पे
आसाम, झारखंड, मणिपूर, आंध्रप्रदेश, पंजाब,
ओरिसा, कर्नाटक आणि मध्यप्रदेशात दोन टप्पे
केंद्रशासित प्रदेशांमध्ये एक टप्पा
७१ कोटींपेक्षा अधिक मतदार
४० लाख कर्मचाऱ्यांवर जबाबदारी
आदर्श आचारसंहिता लागू
.................................
तारीख मतदारसंघ
१६ एप्रिल- १२४
२३ एप्रिल- १४१
३० एप्रिल- १०७
७ मे- ८५
१३ मे- ८६
...........................
Tuesday, 3 March 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment