कुंकळ्ळी, दि. २ (प्रतिनिधी): काल रात्री केपे तालुक्यातील श्री शांतादुर्गा बाळ्ळीकरीण देवीच्या माहेरवास सोहळ्यादरम्यान वेळीपवाडा येथे काही वैमनस्यातून दोन गटांत तणाव निर्माण होऊन त्याचे पर्यवसान शेवटी तिथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या कुंकळ्ळी पोलिस स्थानकाच्या दोन पोलिसांवर हल्ला होण्यात झाले. याप्रसंगानंतर देवस्थान समितीकडून तसेच स्वतः पोलिसांकडून हल्लेखोरांवर कुंकळ्ळी पोलिसांत तक्रार दाखल झालेली असून एकूण या प्रकरणी दहा जणांवर आरोप ठेवलेले असून पाच महिलांसह दहा जणांना अटक करण्यात आली असल्याचे कुंकळ्ळी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर यांनी सांगितले.सतीश दत्ता वेळीप, सुनील खुशाली वेळीप, मोलू वेळीप, महेंद्र वेळीप, प्रकाश वेळीप,उषा वेळीप,श्रीमती वेळीप,आशा वेळीप, अनुजा वेळीप व रक्षावती वेळीप यांना अटक केली.
याविषयी मंदिर समितीचे अध्यक्ष मोहनदास देसाई यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार श्री शांतादुर्गा बाळ्ळीकरीण देवीच्या माहेरवासस्थानी काही धार्मिक विधी वेळीप गटाकडून पार पाडले जायचे. यंदाही वर्षपद्धतीनुसार श्रीची पालखी माहेरवास सोहळ्यासाठी रायबाग गटाकडून मानपान स्वीकारून वेळीप गटाकडे आल्यावर इथे पूजाविधीबाबत मतभेद निर्माण होऊन वातावरण हातघाईवर येण्याइतपत तंग बनले. यावेळी प्रसंगावधान राखून श्रीच्या पालखीने प्रस्थान केले. यानंतर मात्र जमाव प्रक्षुब्ध झाला व त्यांनी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवरच हल्ला चढवला. यात ए. डी. मिनेझीस, साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, तसेच रमाकांत फळदेसाई हे दोन्ही पोलिस जबर जखमी झाले. यावेळी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक शेखर प्रभूदेसाई तातडीने घटनास्थळी दाखल होत परिस्थितीवर काबू मिळवला. या प्रसंगानंतर श्री शांतादुर्गा बाळ्ळीकरीण मंदिर समितीतर्फे समिती अध्यक्ष मोहनदास फळदेसाई यांनी सदर हल्लेखोरांविरुद्ध पोलिस स्थानकांत श्रीच्या धार्मिक कार्यांत अडथळा निर्माण केल्याची तक्रार दाखल केली असता पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी त्वरित कारवाई केली. १६ हल्लेखोरांवर पोलिसातर्फेही कलम ३५३, २३२ व ३०७ खाली गुन्हा नोंद केला असल्याचेही निरीक्षक संदेश चोडणकर यांनी सांगितले. त्यांच्याच निरीक्षणाखाली पुढील तपास चालू आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment