आंदोलन चिघळण्याची दाट शक्यता
पणजी, दि. १ (प्रतिनिधी) - आम्हाला सहावा वेतन आयोग लागू करा या मागणीसाठी राज्यातील कदंब कर्मचाऱ्यांनी येथील बसस्थानकासमोर सुरू केलेले आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. हा आयोग लागू करण्यासाठी पुरेसा पैसा नसल्याची भूमिका सरकारने घेतली आहे. उद्या सोमवारी कामगार आयुक्तांसमोर होणारी चर्चा अंतिम असेल. सरकार सहाव्या आयोगाची कार्यवाहीबाबत लेखी आश्वासन देत नसेल तर बेमुदत संपाचा इशारा संघटनेचे अध्यक्ष ज्योकिम फर्नांडिस यांनी दिला आहे.
दरम्यान, कदंब महामंडळ कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठी महामंडळाच्या सुमारे ३५० कर्मचाऱ्यांनी २५ फेब्रुवारीपासून धरणे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सरकारकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांचा पारा चढला असून उद्या कामगार आयुक्तांसमोर याप्रकरणी काहीही तोडगा निघाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सरकार एकीकडे महोत्सव तथा कार्यक्रमांवर लाखो रुपयांची उधळण करीत आहे; परंतु कष्टकरी कामगारांना वाऱ्यावर सोडण्यात आल्याची खंत व्यक्त करण्यात आली. यावेळी कामागार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी कामगारांना मार्गदर्शन केले.
कदंबचे अध्यक्ष तथा आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सरकार दरबारी चेंडू टोलवला आहे. वस्तुस्थिती आपण सरकारपुढे ठेवल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वेतन आयोग लागू करणे ही सरकारची जबाबदारी असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. तशी मागणी आपण सरकारकडे केल्याची माहिती त्यांनी दिली.
पाचव्या वेतन आयोगापर्यंत केंद्र सरकारचा वेतन आयोग कदंब महामंडळाला लागू होत नव्हता; परंतु पाचव्या वेतन आयोगाच्या वेळी सरकारबरोबर झालेल्या करारानुसार केंद्र सरकारचा प्रत्येक वेतन आयोग महामंडळाला लागू करण्याची शिफारस करण्यात आली होती. या कारणास्तव सहावा वेतन आयोग या कर्मचाऱ्यांना लागू करावा व २०० नवीन गाड्या महामंडळाच्या ताफ्यात भरती कराव्यात, अशा मागण्या आंदोलकांनी मांडल्या आहेत.
Monday, 2 March 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment