डिचोली, दि. ३ (प्रतिनिधी): चोडण येथे प्रवाशांच्या सोयीसाठी नियमित चार फेरीबोटी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आज सकाळी ८ वाजल्यापासून नागरिकांनी फेरीसेवा रोखून धरली व दुपारी १२. ३० वाजता ठोस आश्वासनानंतर रोखून धरलेली सेवा पूर्ववत सुरू झाली.
रायबंदर ते चोडण या जलमार्गावरील फेरीसेवा गेले काही महिने प्रवाशांना डोकेदुखी बनली होती. या जलमार्गावर प्रचंड वाढलेली प्रवाशांची, चारचाकी व दुचाकी वाहनांची वर्दळ यांचे अनियमित सेवेमुळे प्रचंड हाल होत होते. या सर्व बाबी जलपरिवहन खात्याच्या नजरेस चोडणवासीयांनी आणून दिल्या होत्या व इथली फेरीसेवा सुरळीत करण्यासाठी सतत तीन फेरीबोटी सुरू ठेवण्याची मागणी केली होती, पण सरकारी पातळीवरून फक्त आश्वासने देण्यात येत होती. चोडणवासीय तसेच मये, डिचोली येथील हजारो प्रवासी या मार्गाचा अवलंब करीत असूनही प्रवाशांच्या या समस्येकडे दुर्लक्षच केले जात होते.
आज संतप्त चोडणवासीयांनी तिन्ही फेरीबोटी चोडण धक्क्यावर बांधून ठेवल्या.यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.चोडण येथे रस्त्यावर दगड, झाडांच्या फांद्या घालून दोन्ही बाजूंनी वाहने अडविण्यात आली होती. पोंबुर्फा, डिचोली आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवासी बसगाड्याही चोडण धक्क्यावर अडवून ठेवण्यात आल्याने प्रवाशांचे बरेच हाल झाले.
दुपारी जिल्हाधिकारी व नदी परिवहन खात्याचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आल्यानंतर व आजपासून तीन फेरीबोटी सतत या मार्गावर सुरू ठेवण्याचे आश्वासन तसेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून चौथी फेरीबोट सुरू करण्याच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या ठोस आश्वासनानंतर दुपारी साडेबाराच्या दरम्यान रोखून ठेवण्यात आलेल्या फेरीबोटी सोडण्यात आल्या.
Wednesday, 4 March 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment