Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 4 March 2009

श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंवर पाकमध्ये दहशतवादी हल्ला

जयवर्धने, संगकारा, समरवीरासह सहा जखमी
लाहोर, दि. ३ : क्रिकेटच्या इतिहासात आजचा दिवस 'काळा दिवस' ठरला. दहशतवादी हल्ल्याच्या सावटाखाली पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंकेच्या क्रिकेट खेळाडूंवर आज सकाळी १२ सशस्त्र हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. येथील लिबर्टी चौकाजवळ झालेल्या या हल्ल्यात श्रीलंकेचे सहा खेळाडू जखमी झाले असून, कमीत कमी आठ पोलिस ठार झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यानंतर श्रीलंकेने आपला पाकिस्तान दौरा रद्द केला असून, श्रीलंकेचे जखमी खेळाडू सोडता इतर खेळाडूंना दुपारी बाराच्या सुमारास मैदानातून लष्करी हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. लाहोर येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस होता व त्यासाठी खेळाडू स्टेडियमकडे जात असतानाच अतिरेक्यांनी खेळाडूंची बस घेरली आणि सर्वप्रथम बसचे टायर्स फोडले आणि नंतर अंदाधूंद गोळीबार केला. अतिरेक्यांनी ग्रेडेनडसही बसवर फेकले.
हल्ला करणारे अतिरेकी श्रीलंकेच्या खेळाडूंना ओलिस ठेवण्याच्या इराद्यानेच आले होते असा दा संशय आहे. कारण त्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणात सुका मेवा आणि दारूगोळा होता.
या हल्ल्यात श्रीलंकेचा कर्णधार महेला जयवर्धनेसह सहा खेळाडू जखमी झाले आहेत. जखमी खेळाडूंमध्ये उपकर्णधार संगकारा, थरांग पाराविताना, अजंता मेंडिस, थिलन समरवीरा, चामिंडा वास यांचाही समावेश आहे. संगकाराच्या खांद्याला तर थारंगाच्या छातीला गोळी लागली आहे. सर्व खेळाडूंवर उपचार सुरू असून या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांंंंंगण्यात आले आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने स्वीकारलेली नाही.
श्रीलंकेच्या खेळाडूंना घेऊन बस गद्दाफी स्टेडियमकडे निघाली होती. स्टेडियमच्या जवळ असलेल्या लिबर्टी चौकात जवळपास १२ हल्लेखोरांनी या बसवर रॉकेट, हातबॉम्ब व अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या साह्याने हल्ला केला. सकाळी ८.४५ ते ९ च्या सुमारास हा हल्ला झाला. बसवर दहशतवादी हल्ला होत आहे असे लक्षात येताच बस चालकाने बस लगेच वळविल्याने मोठा धोका टळला. कारण की हल्लेखोरांनी बसच्या दिशेने रॉकेटचा मारा केला होता. त्यानंतर बसच्या दिशेने त्यांनी हातबॉम्ब फेकले. सुदैवाने त्यांचाही स्फोट झाला नाही. त्यामुळे श्रीलंकन खेळाडू थोडक्यात बचावले, असे म्हणता येईल, असे लाहोरचे पोलिस प्रमुख हबीब-उर-रहमान यांनी सांगितले.
खेळाडूंच्या बसशिवाय मास्क घातलेल्या हल्लेखोरांनी अंपायरच्या गाडीवरही गोळीबार केला असता त्यात पाकिस्तानचे तिसरे अंपायर एहसान रजा जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. तसेच श्रीलंकेचा सहायक प्रशिक्षक पॉल फॉरब्रास यांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत. यावेळी पोलिस व हल्लेखोर यांच्यातही गोेळीबार झाला. यात आठ पोलिस ठार झाले आहेत तर काही हल्लेखोरही जखमी झाले आहेत. मात्र सर्व हल्लेखोर नंतर एका कारमधून पळून जाण्यात यशस्वी ठरले.
पंजाबचे गव्हर्नर सलमान तसीर यांनी हल्ल्यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, लाहोरमधील आजचा हल्ला हा मुंबईवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यासारखा होता. मुंबईवर हल्ला करणाऱ्यांनीच त्याच पध्दतीने हा हल्ला घडवून आणला याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पाकिस्तानी टीव्ही चॅनेल "डॉन न्यूज'ने एका अज्ञात सूत्राचा हवाला देत दावा केला आहे की, श्रीलंकेच्या खेळाडूंना ओलिस ठेवण्याची या हल्लेखोरांची योजना होती. इतर टीव्ही चॅनेल्सने दिलेल्या वृत्तानुसार हल्लेखोर ऑटो रिक्षातून आले. गद्दाफी स्टेडियमपासून अवघ्या एक किमी अंतरावर असलेल्या लिबर्टी प्लाझा चौकाजवळ या हल्लेखोरांनी श्रीलंकेच्या क्रिकेट खेळाडूंना घेऊन येणाऱ्या बसला चारही बाजूने घेरले व बसवर अंदाधूंद गोळीबार करावयास प्रारंभ केला. यानंतर ते वेगवेगळे गट करीत पसार झाले. हल्लेखोरांची संख्या १२ सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या भागाला चारही बाजूने घेरले असून घटनास्थळावरून एक संशयित कार ताब्यात घेतली आहे. दरम्यान मॉडेल टाऊन या भागातून चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याजवळून शस्त्रास्त्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत. हल्लेखोर प्रशिक्षित होते, असे लाहोर पोलिसांनी सांगितले.
हल्लेखोरांच्या पाठीवर बॅग होत्या व त्यात शस्त्रास्त्रे, दारुगोळा व खाण्याचे सामान याचा समावेश होता. या हल्लेखोरांनी अनेक वाहनांना क्षती पोहोचविली तसेच हातबॉम्बही फोडले. हल्लेखोरांपैकी कोणीही ठार झालेला नाही वा पोलिसांच्या हातीही सापडलेला नाही, हे येथे उल्लेखनीय, लाहोर पोलिस प्रमुख हाजी हबीबूर रहमान यांनी सांगितले.
हल्ल्यात जखमी झालेला खेळाडू समरवीरा व थरंगा पाराविताना यांना लाहोर येथील लष्करी इस्पितळात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे श्रीलंकेच्या उच्चायुक्तालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. आमच्यापैकी बहुतेकांना हल्ल्यात किरकोळ जखमा झालेल्या आहेत, बाकी आम्ही सर्व ठीक असून घरी परतण्याशिवाय आमच्यासमोर आता कोणताही विचार नाही, असे श्रीलंकेचा खेळाडू संगकाराने म्हटले आहे. या हल्ल्यात महेला जयवर्धनेही जखमी झाल्याच्या वृत्ताबाबत मात्र संभ्रम निर्माण झाला होता.
श्रीलंका खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसच्या चालकाने आपले नाव उघड न करता सांगितले की, एक उंच व सलवार कमीज परिधान केलेली दाढीधारी व्यक्ती एका पांढऱ्या कारमधून बाहेर आली व तिने माझ्या बसच्या दिशेने हल्ला केला. दुसऱ्या एका हल्लेखोराने एक हातबॉम्ब बसच्या दिशेने फेकला असता तो बसच्या खालून निघून गेला, असे या चालकाने सांगितले. बसमधील लोकांनी आरडाओरड करण्यास प्रारंभ केला तर श्रीलंकेचे खेळाडू म्हणत होते पुढे चल, पुढे चल. त्यामुळे स्टेडियमच्या दिशेने मी बस जोराने हाकली. त्यांनतर श्रीलंकेच्या एका खेळाडूच्या पायाला गोळी लागल्याचे मला दिसून आले. एक रुग्णवाहिका बोलाविण्यात आली व त्यात या जखमी खेळाडूला ठेवत असल्याचे मी बघितले, असे या चालकाने सांगितले.
सुरक्षेच्या कारणास्तव भारत व ऑस्ट्रेलिया यांनी पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तानचा दौरा करण्यास श्रीलंके ने होकार दिला होता. त्याप्रमाणे तीन एकदिवसीय मालिका झाली व त्यात श्रीलंका विजयी झाली होती.

No comments: