मडगाव, दि. १ (प्रतिनिधी) : दीडवर्षापूर्वी पंचायत ग्रामसभेत संमत ठरावानुसार बंद करण्यात आलेल्या सां जुझे आरियाल कक्षेतील नेसाय येथील एका प्रार्थनास्थळाचे बांधकाम सलग सरकारी सुट्टीची संधी साधून काल सायंकाळी सुरू केले. त्यानंतर संतप्त स्थानिक रहिवाशांनी रात्री ते बंद पाडले आणि आता तेथे नेमके काय चालले आहे त्याची तपासणी उद्या (सोमवारी) ग्रामपंचायतीतर्फे केली जाणार आहे.
नेसाय येथील एका घराचे रूपांतर प्रार्थनास्थळात करण्याच्या प्रकाराचे संतप्त पडसाद ग्रामसभेत उमटून स्थानिकांच्या दडपणाखाली ते बांधकाम बंद पाडण्याचा ठरावही संमत झाला होता. ते प्रकरण तसेच असताना काल सायंकाळी सोडसहाच्या सुमारास त्या बांधकामाला लागूनच परत तसेच बांधकाम करण्याचा प्रकार सुरू झाला. त्यामुळे स्थानिक खवळले. तेथे जमाव गोळा झाला. त्यांनी स्थानिक सरपंच मार्था कार्दोज यांना बोलावून आणले व तेथे काय चालले आहे ते तपासण्याची मागणी केली. त्यांनी चालू असलेले बांधकाम बेकायदा असल्याचे सांगताच वातावरण तंग झाले .
कोणीतरी मायणा कुडतरी पोलिसांना कळवताच ते त्वरित मोठ्या संख्येने पोलिस कुमक घेऊन तेथे दाखल झाले. आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स हेही दाखल झाले. स्थानिक रहिवाशांनी केलेली तक्रार तसेच सरपंचांनी काढलेला निष्कर्ष याआधारे पोलिसांनी बांधकामासाठी आणलेली क्रेन जप्त केली. तसेच पंचनामा केला. वातावरण तंग असल्याने तेथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.
सोमवारी सदर जागेच्या तपासणीचे आश्र्वासन सरपंचांनी दिल्यावर वातावरण निवळले. या बांधकामाला दीड वर्षापूर्वी स्थगिती दिली होती व आताही पंचायतीने नव्याने ना हरकत दाखला दिलेला नाही असे स्पष्टीकरण मार्था यांनी दिले.
या भागात विशिष्ट धर्माची वर्दळ व त्यांनी जागोजागी सुरू केलेले भंगारअड्डे याबाबत गेल्याच आठवड्यात स्थानिकांनी आवाज उठवला होता. त्यापाठोपाठ हा प्रकार घडला आहे.
दरम्यान, सांजुझे आरियाल पंचायतीची आजची ग्रामसभा बहुतेक पंच न फिरकल्याने कोणत्याही कामकाजाविना तहकूब करण्यात आली. कालच्या नेसाय प्रकरणातून सभेत खडाजंगी माजेल व परिस्थिती गंभीर वळण घेण्याची शक्यता लक्षात घेऊन हे पंच
सभेपासून दूर राहिले, असे बोलले जात होते.
Monday, 2 March 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment