नवी दिल्ली, दि. २ : अजित सिंग यांच्या राष्ट्रीय लोकदलाने आज भाजपाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (रालोआ) प्रवेश केला. आगामी लोकसभा निवडणूक उत्तरप्रदेशात भाजपासोबत लढण्याची घोषणाही अजित सिंग यांनी केली आहे.
भाजपा मुख्यालयात रालोआचे संयोजक शरद यादव, भाजपाध्यक्ष राजनाथ सिंग, पंतप्रधान पदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात अजित सिंग यांनी ही घोषणा केली. आतापर्यंत वेगवेगळ्या आघाडीत राहिलेले अजित सिंग निवडणुकीनंतरही रालोआतच राहतील काय, असे विचारले असता सिंग म्हणाले की, आता येणे-जाणे हा प्रकार राहिलेला नाही. यावेळी आम्ही स्वत:हून रालोआत आलो आहोत.
या प्रश्नाचे आता फारसे औचित्य नाही, असे भाजपाध्यक्ष राजनाथ सिंग म्हणाले. जागावाटपाबाबत बोलताना राजनाथ सिंग म्हणाले की, यासंदर्भात आमची आपसात चर्चा झाली आहे. औपचारिक घोषणा नंतर केली जाईल. पश्चिम उत्तर प्रदेशात राष्ट्रीय लोकदलाचा चांगला प्रभाव आहे. त्यामुळे त्या भागातील जागा त्यांना देण्यास आमची काहीच हरकत नाही. अद्याप किती जागा कोणाला मिळतील, हे ठरलेले नाही. पश्चिम उत्तर प्रदेशात लोकसभेच्या २५ जागा आहेत, हे येथे उल्लेखनीय.
यावेळी बोलताना अडवाणी म्हणाले की, अजित यांचा पक्ष रालोआत येणे ही घटना अतिशय आशादायी आहे. या घटनेमुळे आता कॉंग्रेस नेतृत्वातील संपुआ सरकारपासून जनतेची सुटका होण्याची शक्यता बळावली आहे. शिवाय, उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या अनागोंदी कारभारालाही लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. या दृष्टीने हे पहिले पाऊल ठरेल, असेही ते म्हणाले.
Tuesday, 3 March 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment