पणजी, दि. २ (प्रतिनिधी): शिरदोण बांबोळी येथील उतरणीवर स्विफ्ट वाहनाने झाडाला जोरदार धडक दिल्याने वाहन चालक मायर्नादो पेगादो डिसोझा ऊर्फ 'टोटो' (२६) याचा १ मार्च रोजी दुपारी ४ वाजता एका खाजगी इस्पितळात उपचार सुरू असताना मृत्यू झाला; तर दुसरा गंभीर जखमी असून त्याची स्थिती नाजूक असल्याची माहिती आगशी पोलिसांनी दिली.
आसगाव येथे राहणारा "टोटो' याच्यावर उत्तर गोव्यातील हणजूण, कळंगुट व पणजी पोलिस स्थानकांत अनेक गुन्हे दाखल असून विविध प्रकरणात तो पोलिसांना हवा होता. गेल्या वर्षी मयत "टोटो' याला पणजी पोलिसांनी अटक केल्यानंतर १९ फेब्रुवारी ०८ रोजी पणजी पोलिस स्थानकाबाहेर "रणकंदन' माजले होते. तसेच त्याच्या सुटकेची मागणी करून जमावाने पोलिस स्थानकावर जोरदार दगडफेक केली होती.
आगशि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार २८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ वाजता "टोटो' व ताळगाव येथे रहणारा त्याच्या मित्र अँथनी रॉड्रिगीस (२८) हे दोघेही माजोर्डा येथून पणजीत परतत होते. यावेळी शिरदोण येथील उतरणीवर स्विफ्ट वाहनावरील ताबा गेल्याने वळणावर असलेल्या एका झाडाला जोरदार धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले असता त्यांना पणजीतील एका खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. टोटो याच्यावर उपचार सुरू असताना दुपारी त्याचे निधन झाले. पोलिसांनी अपघाती निधन म्हणून नोंद केली आहे. स्विफ्ट या वाहनाच्या मालकाची अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
शिरदोण येथील बस स्थानकाच्या जवळ असलेली ही उतरती वाहन चालकांसाठी धोकादायक असून गेल्या पंधरा दिवसात याठिकाणी वेगवेगळ्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आगशी पोलिसांनी दिली. याविषयीचा अधिक तपास उपनिरीक्षक सुनील गुडलर करीत आहेत.
Tuesday, 3 March 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment