नवी दिल्ली, दि. ४ : विद्यमान निवडणूक आयुक्त नवीन चावला येत्या २० एप्रिल रोजी पुढील मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. त्या दिवशी सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी निवृत्त होणार असून त्यांचीच जागा नवीन चावला घेणार आहेत. राष्ट्रपती भवनातून प्रसिद्धीला देण्यात आलेल्या पत्रकानुसार राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी नवीन चावला यांच्या मुख्य निवडणूक आयुक्त पदाच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. त्यांची ही नियुक्ती गोपालस्वामी २० एप्रिलला निवृत्त झाल्यानंतर अंमलात येईल, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, नवीन चावला यांच्या या नियुक्तीच्या विरोधात युनायटेड कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षाने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली असून त्यावर येत्या २० मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
निर्णय दुर्दैवी : भाजपा
मुख्य निवडणूक आयुक्तपदी नवीन चावला यांच्या नियुक्तीचा निर्णय हा दुर्दैवी असून या निणर्याच्या विरोधात आम्ही लवकरच न्यायालयात धाव घेणार आहोत, अशी प्रतिक्रिया भाजपातर्फे व्यक्त करण्यात आली आहे.
गोपालस्वामी २० एप्रिल रोजी निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी चावला यांची नियुक्ती केली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयावर भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी कठोर शब्दात टीका केली आहे.
ज्या व्यक्तीला मुख्य निवडणूक आयुक्तांनी या पदासाठी लायक ठरविले नाही आणि त्यांना हटविण्याची शिफारस केली, त्याच व्यक्तीला मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्याचा सरकारचा हा निर्णय दुर्दैवी आहे, असेही जेटली म्हणाले.
चावला यांना मुख्य निवडणूक आयुक्त बनविण्याचा निर्णय कोणत्या निष्पक्ष संस्थेने नव्हे, तर ज्यांच्या प्रती चावला यांनी निष्ठा ठेवून पक्षपात केल्याचा आरोप त्यांच्यावर गोपालस्वामी यांनी केला आहे, त्याच राजकीय पक्षाने त्यांच्या या नियुक्तीचा निर्णय घेतला आहे, याकडेही जेटली यांनी लक्ष वेधले.
या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात जाण्याबाबतचे विचारले असता जेटली म्हणाले की, योग्य वेळ आल्यानंतर इतर पर्यायांबाबत आम्ही विचार करू. आपण निष्पक्ष असल्याचे सिद्ध करण्यासाठी आता चावला यांच्यावर मोठे दडपण राहणार आहे. संपूर्ण देशच आता त्यांच्या प्रत्येक बाबीकडे बारीक नजर ठेवून पाहणार आहे, असेही जेटली म्हणाले.
Thursday, 5 March 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment