पणजी, दि.२ (प्रतिनिधी): 'सिदाद द गोवा' हॉटेलचा एक भाग बेकायदा ठरवून तो पाडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असतानाही आता हॉटेलवरील संभावित कारवाई रोखण्यासाठी राज्य सरकारने वटहुकूम जारी केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या या निर्णयाला राज्यपालांनी अनुमती दिल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिली. यासंबंधात गेले दोनतीन दिवस राज्यात चर्चा सुरू असून
दिल्लीहून आजच परतलेले मुख्यमंत्री कामत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वरील माहिती त्यांनी दिली."सिदाद द गोवा' कडून अजिबात बेकायदा बांधकाम झालेले नाही. सरकारचे आवश्यक परवाने मिळवूनच हे बांधकाम करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सुरुवातीला सरकार व हॉटेल यांच्यात झालेल्या करारातील काही अटींची चुकीच्या पद्धतीने मोजमापणी करण्यात आल्यानेच हा घोळ झाल्याचे ते म्हणाले.सरकारने या वटहुकुमाव्दारे या करारात आवश्यक दुरुस्ती करण्याचा अधिकार प्राप्त केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. सदर वटहुकमाबाबत मात्र सरकारने कमालीची गोपनीयता राखली आहे. या वटहुकमावर राज्यपालांनी शनिवारी सही केल्याची माहिती दिली जात असली तरी अद्याप हा वटहुकूम सार्वजनिक करण्यात आला नाही. लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात राज्यात आचारसंहिता लागू झाल्याने हा वटहुकूम वेळीच काढण्यात आल्याची चर्चाही सुरू आहे.
दरम्यान,सिदाद दी गोवासाठी सरकार पुढाकार घेत असताना "सीआयझेड' कायद्याची टांगती तलवार राज्यातील हजारो लोकांवर लटकत असताना सरकार काहीही करीत नाही,अशी भावना लोकांची बनली आहे,असे विचारले असता या लोकांना दिलासा देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आपण दिल्याचे सांगून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पत्र पाठवणारच...
केंद्रीय अबकारी आयुक्त माथूर यांनी आपल्या कार्यालयावर केलेल्या आरोपांबाबत दिल्लीत तक्रार करणार होतो परंतु लोकसभा निवडणुकीमुळे दिल्लीत कुणीही नसल्याने वित्तमंत्र्यांची भेट घेता आली नाही,असे मुख्यमंत्री कामत म्हणाले.या संदर्भात आपण केंद्रीय वित्तमंत्र्यांना पत्र पाठवणारच असा पुनर्उच्चारही त्यांनी यावेळी केला.
लोकसभा उमेदवारांची लवकरच घोषणा
लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसचे उमेदवार येत्या तीन ते चार दिवसांत घोषित होतील,अशी माहिती मुख्यमंत्री कामत यांनी दिली. सध्या संभावित उमेदवारांची यादी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवण्यात आली असून अंतिम निर्णय त्यांच्याकडून घेतला जाईल,अशी माहितीही यावेळी त्यांनी दिली.
Tuesday, 3 March 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment