'कॅसिनो रॉयल'प्रकरणी पर्रीकरांची आग्रही मागणी
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): "कॅसिनो रॉयल'प्रकरणी आपल्या कार्यालयाकडून केंद्रीय सीमाशुल्क व अबकारी आयुक्त चंद्रहास माथूर यांच्याशी अजिबात संपर्क साधण्यात आला नाही, किंवा या जहाजाची या खात्यातून सुटका करून घेण्यासाठी दबावही आणला नाही, या मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी घेतलेल्या भूमिकेचा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज खरपूस समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांची ही भूमिका पूर्णपणे दिशाभूल करणारी आहे. त्यांच्या व मुख्य सचिवांच्या कार्यालयांकडून यासंदर्भात केंद्रीय अबकारी आयुक्त कार्यालयाकडे साधण्यात आलेल्या संपर्काची न्यायालयीन चौकशी व्हावी; जेणेकरून सत्य उजेडात येईल, अशी मागणीही पर्रीकर यांनी केली.
आज पणजी येथे पत्रपरिषदेत पर्रीकर यांनी कॅसिनोप्रकरणी पुन्हा एकदा सरकारला चांगलेच धारेवर धरले. गोव्यात मुक्तपणे कॅसिनो जहाजांना परवाना देण्यामागे कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला. "कॅसिनो रॉयल" हा जहाजाला दिलेला परवाना हा पूर्णपणे बेकायदा असून त्याबाबतची माहिती गेल्या विधानसभा अधिवेशनात दिली आहे. एवढे करूनही हा परवाना रद्द होत नसेल तर मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री, मुख्यसचिव व इतर संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्याचा सज्जड असा इशाराही पर्रीकर यांनी दिला.
केंद्रीय अबकारी आयुक्तालयाकडून "कॅसिनो रॉयल'वर केलेल्या मेहेरनजरेमुळे सरकारला सुमारे तीन ते चार कोटी रुपये महसूल गमवावा लागला. यासंदर्भात केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाकडे तक्रार करणार असून अबकारी खात्यातील महसूल गळतीची चौकशी त्यांच्याकडून केली जाते,असेही पर्रीकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात केलेला खुलासा हा म्हणजे कातडी बचावण्यासाठी केलेली धडपड असल्याचा टोला पर्रीकरांनी लगावला. केवळ आरोपांचे खंडन करून संशयाचे मळभ दूर करता येणार नाही तर त्यांनी याप्रकरणी तात्काळ सदर कॅसिनोचा परवाना रद्द करावा,अशी सूचना पर्रीकरांनी केली.
"कॅसिनो रॉयल'ला परवाना देताना सुमारे तीन ते चार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. मांडवी नदीतील तरंगती कॅसिनो जहाजे तसेच हॉटेलांना दिलेल्या कॅसिनो परवाना प्रकरणी सुमारे ६० ते ७० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय पर्रीकर यांनी व्यक्त केला. याप्रकरणी पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून येत्या काळात हा घोटाळा उघड केला जाईल,असे संकेत त्यांनी दिले.
"कॅसिनो रॉयल' हे विदेशी जहाज असल्याचा खुलासा खुद्द मुख्य सचिव जे. पी. सिंग यांनी केल्याने याप्रकरणी सरकारच्या गैरव्यवहारांची लक्तरेच वेशीवर टांगली गेली आहेत,असा गौप्यस्फोटही पर्रीकर यांनी केला. या जहाजाला अबकारी कायद्याचे उल्लंघन करून बेकायदा परवाना देण्यात तो रद्द व्हायलाच हवा, अशी मागणी पर्रीकर यांनी केली. या जहाजाला बंदर कप्तानाचा ना हरकत दाखला नसताना ते अजूनही मांडवी नदीत बेकायदा व्यवहार करीत असल्याचा आरोप करून याबाबत तात्काळ कारवाई करण्याचा इशाराही पर्रीकर यांनी दिला.
पत्राचा मसुदा उघड करा
केंद्रीय सीमाशुल्क तथा अबकारी आयुक्त माथूर हे खोटे बोलल्याचा आरोप करतानाच त्यांनी विनाकारण मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर आरोप केल्याचे सांगून त्यांच्याविरोधात केंद्रीय वित्तमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे. मुळात यासंदर्भात माथूर यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी करावी,असे सांगून अबकारी आयुक्तांची बदली करून मुख्यमंत्री या प्रकरणावर पडदा टाकण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप पर्रीकर यांनी केला. अबकारी आयुक्त कार्यालय हे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापेक्षा उच्च आहे. मुख्यमंत्र्यांना खरोखरच असे पत्र पाठवण्याचे धाडस असेल तर त्यांनी हे पत्र प्रसारमाध्यमांसमोर उघड करावे व आपले वक्तव्य सिद्ध करावे,असे आव्हान पर्रीकर यांनी दिले.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आपणही केंद्रीय वित्तमंत्र्यांना करणार आहोत, असेही पर्रीकर यांनी निक्षून सांगितले.
Sunday, 1 March 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
saale sub ke sub chor kahinke!
Post a Comment