संघर्ष समितीचा खणखणीत इशारा
पेडणे, ता. १ (प्रतिनिधी) : धारगळ येथील नियोजित क्रीडा नगरीतून जोपर्यंत बागायतीसोबत सर्व शेतजमीन वगळली जात नाही तोपर्यंत क्रीडानगरी विरोधी जमीन बचाव संघर्ष समितीच्या झेंड्याखाली सर्व शेतकरी एकत्र राहून आंदोलन व विरोध चालूच ठेवणार असल्याचा इशारा निमंत्रक दुर्गादास परब आणि अन्य शेतकऱ्यांनी दिला.
दरम्यान, क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत सरपंच व इतरंनी केले असले तरी त्याविषयी समितीने म्हटले आहे की, मंत्री आजगावकर यांच्या बहुतांश निर्णयाबाबत "होयबा' अशी भूमिका घेऊन माना डोलवणाऱ्यांनी आजपर्यंत काय केले? संबंधितांनी याबाबत आत्मनिरीक्षण करावे. जोपर्यंत या संभाव्य प्रकल्पातून संपूर्ण शेतजमीन वगळली जात नाही. तोपर्यंत संघर्ष चालूच राहणार आहे.
आधी मोप विमानतळ करा
क्रीडानगरीसारखे पांढरे हत्ती उभारण्याऐवजी क्रीडामंत्र्यांनी मोप विमानतळाच्या थंडावलेल्या प्रक्रियेला चालना देऊन ती पूर्ण करावी. या विमानतळाला सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव अधून-मधून विरोध दर्शवत आहेत. त्यांचा आवाज बंद करण्यासाठी आजगावकर यांनी शक्ती खर्ची घालावी. मोप विमानतळ साकारला तर खऱ्या अर्थाने तालुक्याचा विकास होईल. त्याचबरोबर हजारोंनी रोजगार उपलब्ध होणार आहे. ५७० कोटी खर्च करून क्रीडा नगरी उभारण्यापूर्वी गावागावांत क्रीडा मैदाने नाहीत. ती अगोदर बांधावी, अशी सूचना समितीने केली आहे.
नियोजित क्रीडानगरीच्या जागेतून तिळारी कालवा गेला आहे. त्या पाण्याचे काय करणार? या कालव्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चण्यात आले आहेत हेही लक्षात घ्या, असे समितीने बजावले आहे.
दरम्यान, भारतीय किसान संघाचे महासचिव श्रीरंग जांभळे यांनी २७ रोजी नियोजित जागेला भेट दिली व शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांना पाठिंबा दिला, असे परब यांनी सांगितले. पेडणे सावळवाडा येथील क्रीडांगणाच्या ठिकाणी असलेल्या गैरसोयींवर तोडगा काढावा, अशी मागणीही परब यांनी केली आहे.
Monday, 2 March 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment