Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 15 February 2009

तालिबानचा पाकिस्तानवर ताबा मिळविण्याचा इरादा

आमची आता अस्तित्वाची लढाई : झरदारी

न्यूयॉर्क, दि. १४ ः अमेरिकेचे नवे प्रशासन आणि भारताच्या वाढत्या दबावामुळे आता पाकिस्तान दहशतवादासंदर्भात आपली भूमिका स्वीकारण्यास बाध्य झाला आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या षडयंत्राचा काही भाग पाकमध्ये रचण्यात आल्याची कबुली दिल्यानंतर पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी तालिबानने पाकिस्तानचा बराच मोठा भूभाग व्यापला असून आता तर ते आमच्या देशावरच ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याचे मान्य केले आहे.
नाका तोंडात पाणी शिरल्यामुळे तसेच पाकला स्वत:च्या अस्तित्वाचा धोका वाटत असल्यामुळेच अखेर बऱ्याच मोठ्या भूभागावर तालिबानचा ताबा असूून ते संपूर्ण पाकिस्तानलाच गिळंकृत करण्याच्या इराद्याने पुढे सरकत असल्याची माहिती झरदारी यांनी दिली आहे. आजवर तालिबानच्या वाढत्या कारवाया आणि प्रभाव नाकारणाऱ्या पाकच्या भूमिकेत अचानक चकित करणारे परिवर्तन झाले आहे. आमच्या लष्कराची शक्ती वाढली नाही. तसेच त्यात अनेक त्रुटी आहेत. नेते केवळ तोंडाने फुशारक्या मारत राहिले. परिणामी तालिबानी त्यांच्या वाढत्या सामर्थ्यामुळे आमच्या सैन्यालाच डोळे दाखवायला लागले आहेत. पाकिस्तानी लष्करातील उणिवांचा तालिबानने लाभ घेतला असे स्पष्टीकरण सीबीएस न्यूजशी बोलताना झरदारी यांनी दिले.
पाकिस्तानच्या आदिवासी (कबायली) भागात तालिबान व अल-कायदाने आपली स्थिती मजबूत केल्याची प्रतिक्रिया राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर ओबामा यांनी व्यक्त केली होती हे येथे उल्लेखनीय! पाकिस्तान दहशतवादाविरोधातील लढ्यात किती मजबूत सहकारी म्हणून पुढे येतो, तेच आता बघावे लागेल असेही ते म्हणाले होते.
पाकने सध्या तालिबानचा प्रभाव असलेल्या क्षेत्रात १ लाख २० हजार सैनिक तैनात केले आहेत. हा लढाही अमेरिकाच देत असल्याची पाकच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र झरदारी यांनी हा दावा फेटाळून लावताना आम्ही कोणावरही उपकार करीत नाही. पाकवर ताबा मिळविण्याचे तालिबानने षडयंत्र रचले असून त्याची आम्हाला जाण आहे आणि त्यामुळे स्वत:च्या अस्तित्वासाठी लढणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो असे स्पष्ट केले.
लष्कर आणि गुप्तचर एजन्सीमधील अस्थिरतेच्या अफवा खारीज करताना, लष्कर सरकारसोबत नसते पाकिस्तानवर तालिबानने केव्हाच ताबा मिळविला असता. अतिरेक्यांचे इरादे घातक असून त्यांच्याविरुद्ध सैन्य संपूर्ण शक्तीचा वापर करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments: