Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 16 February 2009

कसाबला प्रशिक्षण दिलेले पाकमधील केंद्र सापडले

नवी दिल्ली, दि.१५: मुंबईवरील हल्ल्यात अन्य दहशतवादी ठार झाले असले तरी अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानलेला आरोपी मोहम्मद अजमल कसाब हा भारताच्या ताब्यात असून आता तर त्याच्या पाकिस्तामधील प्रशिक्षण केंद्राची माहितीही उपलब्ध झाल्याने त्याने केलेल्या गुन्ह्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जाते. कसाबचे हे प्रशिक्षण केंद्र पाकिस्तानातल्या डोरी या ठिकाणी आहे. कसाबचं प्रशिक्षण शिबीर शोधल्याचा दावा पाकिस्तानमधल्या "जीओ टीव्ही'ने केला आहे.
भारतापासून शंभर किलोमीटरवर पाकिस्तानातल्या डोरी या ठिकाणी कसाबचे प्रशिक्षण शिबीर सापडले आहे. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याची तयारी डोरीतल्या घरात झाली आहे , तसे सांगणारे अनेक पुरावे तिथे सापडले आहेत. सद्यस्थितीत डोरीतले कसाबचे प्रशिक्षण शिबीर पाक पोलिसांनी सील केले असल्याची माहिती या दूरचित्रवाणी वाहिनीने दिली आहे. या सील केलेल्या घरात ब्लॅंकेट्स, चटई, इस्लामिक पूजासाहित्य, वृत्तपत्रे, भारताचा आणि मुंबईचा नकाशा, लाइव्ह जॅकेट्स, निरनिराळी पुस्तके ,अरेबिक तसेच फारसी भाषेतली काही हस्तलिखिते,फळा,खाद्यपदार्थ अशा बऱ्याच गोष्टी जिओ टीव्हीला सापडल्या आहेत. या सापडलेल्या वस्तूंवरून काही लोक त्या ठिकाणी राहत होते,असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबईवरच्या हल्ल्यानंतर किमान पंधरा दिवस तरी लोक रहात होते,असे डोरी गावात राहणाऱ्या लोकांनी सांगितल्याचे या वाहिनीने जाहीर केले आहे.
मात्र मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानात सहाजणांना अटक केल्याची माहिती तिथल्या अंतर्गत सुरक्षा मंत्र्यांनी दिली होती. पण आता तिथल्या काही प्रसिद्धीमाध्यमांनी सरकारच्या सूत्रांचा हवाला देऊन अशी कोणतीच अटक झालेली नाही, तर त्यांना ताब्यात घेतल्याचा दावा सरकारने केल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे यामागची पाकिस्तानची दुटप्पी भूमिका स्पष्ट झाली आहे. तसेच पाकिस्तानात तालिबानी अतिरेकी मोठ्याप्रमाणावर असून , आमचे सरकार तसेच संपूर्ण देशच आज अस्तित्वाची लढाई लढत असल्याची धक्कादायक कबुली पाकिस्तानचे अघ्यक्ष आसिफ अली झरदारी यांनीच दिली आहे. अमेरिकेतल्या ' सीबीएस टीव्ही नेटवर्क ' ला दिलेल्या मुलाखतीत झरदारी यांनी ही कबुली दिली आहे तर मुंबईवरील हल्ल्यात भारताच्या हाती लागलेला एकमेव अतिरेकी कसाबला तपासासाठी आपल्या ताब्यात द्या,अशी मागणी कदाचित आम्ही करू,अशी शक्यता पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. कसाब हा पाकिस्तानी नागरिक असून त्याला आम्ही शिक्षा करू, त्याला आमच्या ताब्यात द्या असेही पाकिस्तानने म्हटले आहे. यावरून पाकिस्तान किती सारवासारव करीत आहे हे समोर आले आहे.

No comments: