Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 21 February 2009

मोदी आज गोव्यात

पणजी, दि. २० (प्रतिनिधी): आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गोव्याचे प्रभारी म्हणून नियुक्त केलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे उद्या शनिवारी गोव्यात आगमन होत असून यावेळी उत्तर व दक्षिण गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांसाठी खास संमेलनाचे आयोजिण्यात आल्याची माहिती आज विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी दिली.
२२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मडगाव येथील कॉस्ता मैदानावर तर, दुपारी ४ वाजता म्हापसा येथे बोडगेश्वर मंदिरासमोरील मैदानावर कार्यकर्त्यांचे संमेलन होणार आहे. या संमेलनात ५ ते ६ हजार कार्यकर्ते उपस्थिती लावणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर श्री. मोदी यांची ही पहिलीच गोवा भेट आहे असल्याचे श्री. पर्रीकर म्हणाले.
एप्रिलच्या अखेरीस सार्वत्रिक निवडणूक घोषित होण्याची शक्यता असून दोन्ही जिल्ह्यांत भाजपने आपले उमेदवार जनतेसमोर ठेवले आहेत. विद्यार्थ्यांना अर्ध्या तिकिटचा हक्क मिळवून देण्यासाठी छेडलेल्या आंदोलनाचे सचिवपद भूषवून या लढ्यात सक्रिय भाग घेतलेले तडफदार उमेदवार ऍड. सावईकर यांच्या रुपाने दक्षिण गोव्यासाठी देण्यात आला आहे; तर उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक यांची सहा महिन्यांपूर्वीच घोषणा करण्यात आली आहे. ऍड. सावईकर हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थिदशेपासून सक्रिय कार्यकर्ते असून परिषदेचे महामंत्री आणि अध्यक्षपदही भूषवले आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्ता त्यांना माहिती आहे. तसेच त्यांनी सहकार क्षेत्रात व वकील म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात बहुमोल कामगिरी करून आपला ठसा उमटवल्याचे पर्रीकर म्हणाले.
उत्तर गोवा लोकसभा निवडणूक व कार्यकर्ता संमेलनासाठी मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांना प्रमुख केले आहे, तर दक्षिण गोव्यासाठी आमदार दामोदर नाईक यांची प्रमुख म्हणून निवड केली आहे. या दोघांना आमदार फ्रान्सिस डिसोझा, आमदार विजय पै खोत व माजी आमदार विनय तेंडुलकर साहाय्य करणार आहेत.

No comments: