Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 15 February 2009

हुबळीनजीक अपघातात वास्कोतील तीनजण ठार

आठजण गंभीर; नवे वाडे परिसरावर शोककळा
बेळगाव व वास्को, दि. १४ (प्रतिनिधी) - कर्नाटकातील हुबळीनजीक राष्ट्रीय महामार्गावर (क्रमांक ४) मन्सूर ब्रिजपाशी आज पहाटे ४.१५ च्या सुमारास क्वालिस जीप (जीए ०६ ए ४१०१) व ट्रक (केए १८ ए २७४) यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन घडलेल्या भीषण अपघातात वास्कोतील तिघे ठार, तर आठजण गंभीर जखमी झाले. त्यामुळे वास्कोतील नवे वाडे परिसरावर शोककळा पसरली आहे. सर्व जखमींवर हुबळीतील कर्नाटक मेडिकल कॉलेजच्या इस्पितळात उपचार सुरू आहेत.
धारवाड ग्रामीण पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक के. एस. रायमणी यांनी दिलेल्या माहितीनुसार जेथे हा अपघात घडला तेथे रस्ता दुभाजक नव्हते. मृतांची नावे लक्ष्मण गंगाधर, अनिल गंगाधर व शिकंदर देसाई अशी आहेत. त्यापैकी लक्ष्मण हा काका असून अनिल हा त्याचा पुतण्या होता. हे दोघे जागीच ठार झाले, तर सिकंदर देसाई हा उपचारासाठी इस्पितळात नेले जात असताना मरण पावला.
हे सर्व जण एका विवाहासाठी कौशिक नाईक यांची भाड्याची गाडी करून हुबळीला निघाले होते. मन्सूर ब्रिज येथे ते पोहोचले असता त्यांची गाडी व ट्रक यांची जोरदार धडक झाली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, क्वालीसमधील दोघे जागीच ठार झाले. जखमींच्या किंकाळ्यांनी सारा परिसर दणाणून गेला. अनिल केशव, विठ्ठल कोल्हापुरे, सुनिता गंगाधर, प्रभाकर मणिक, महेश कोल्हापुरे व अरविंद गंगाधर (पाच वर्षांचा मुलगा) अशी जखमींची नावे आहेत. अरविंद याचा अपवाद वगळता जखमी झालेले सर्वजणांचे वय सुमारे तीसच्या आसपास आहे. अपघातग्रस्त ट्रकच्या चालकाला धारवाड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या अपघातात ठार झालेल्या सिकंदर देसाई याचे वास्कोत "साफा' हे अत्याधुनिक केशकर्तनालय आहे. अनिल गंगाधर व लक्ष्मण गंगाधर हे नवे वाडे येथील अन्य केशकर्तनालयात कामाला होते. या तिघांच्या मृत्यूचे वृत्त नवे वाडे येथे येऊन थडकताच नवे वाडे भागावर शोककळा पसरली. तेथील नाभिकांनी आपली दुकाने बंद ठेवून त्यांना आदरांजली अर्पण केली. अनेकांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. त्यातील काही जण या तिघांचे मृतदेह आणण्यासाठी तातडीने हुबळीला रवानाझाले.

No comments: