राजकीय वर्तुळात खळबळ
नवी दिल्ली, दि. १८ - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना विलक्षण वेग येत चालला असून समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांनी आज भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घेऊन संभाव्य राजकीय सोयरीकीबाबत त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे राजधानीतील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
खुद्द मुलायमसिंग यांनीच आज येथे ही माहिती पत्रकारांना दिली. जर भाजपने आमच्या अटी मान्य केल्या तरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी आमचे सहकार्य शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तथापि, या अटी कोणत्या याबद्दल त्यांनी गुप्तता पाळली आहे. सध्या समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेस यांच्यातील दरी झपाट्याने रुंदावत चालली आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर कॉंग्रेस पक्ष एकाकी पडत चालल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः उत्तर प्रदेशातील जागावाटपावरून कॉंग्रेस व समाजवादी पक्ष यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. समाजवादी पक्षाने कॉंग्रेसला केवळ बारा जागा देऊ केल्या असून तेवढ्या जागांवर समाधान मानण्यास कॉंग्रेसने नकार दिला आहे. कॉंग्रेसच्या या आडमुठ्या धोरणामुळे समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अमरसिंग यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळेच राष्ट्रीय राजकारणातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत चालल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
कॉंग्रेसशी राष्ट्रवादीची फारकत?
घटकपक्षांशी राष्ट्रीय पातळीवर आघाडी न करण्याच्या कॉंग्रेसच्या भूमिकेवर काहीसे नाराज असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आक्रमक पवित्रा घेत कॉंग्रेसशी काडीमोड घेण्याचा इशारा दिला. कॉंग्रेसला आघाडी करायची नसेल तर आम्हालाही आमचे रस्ते मोकळे आहेत, असे सांगत भाजप वगळता अन्य कुणाही पक्षाशी निवडणूक वाटाघाटी करण्याचा आमचाही अधिकार आहे, असे पवार यांनी आज सांगलीत बजावले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात दिल्लीत गुप्त बैठक झाल्याच्या बातमीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र येतील, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. उद्धव ठाकरेंशी भेट झाल्याच्या वृत्ताचा पवार यांनी इन्कार केला नाही. मात्र ठाकरे कुटुंबियांशी माझे कौटुंबिक, वैयक्तिक संबंध आहेत. त्यातून राजकीय अर्थ काढण्याचे कारण नाही, अशी पुस्ती जोडायला ते विसरले नाहीत.
केंद्रातील सत्ताधारी संपुआचा घटकपक्ष म्हणून भाजपप्रणित रालोआप्रमाणे कॉंग्रेसप्रणित आघाडीच्या घटकपक्षांची राष्ट्रीय पातळीवर आघाडी व्हावी, असा आमचा आग्रह होता. परंतु अलीकडेच कॉंग्रेस कार्यकारिणीने घटकपक्षांशी राष्ट्रीय आघाडी न करता, राज्य पातळीवर निवडणूक समझोता करण्याचा निर्णय घेतला. कॉंग्रेसला त्यांची भूमिका ठरवण्याचा अधिकार आहे, त्याबाबत आम्ही नाराज होण्याचे कारण नाही. परंतु आता आम्हालाही नवे रस्ते किंवा पर्याय शोधावे लागतील. कॉंग्रेसशी आघाडी व्हावी, अशी आमची अजून तरी इच्छा आहे. परंतु कॉंग्रेसला ते शक्य नसेल तर इतर पक्षांशी वाटाघाटी करण्याचा आमचा अधिकार आहे.
आतापर्यंत जागावाटपात राष्ट्रवादीने नेहमीच नमती भूमिका घेतली. आताही रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पार्टी यांना सोबत घेऊनच जागावाटप करावे, असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. कॉंग्रेसला तो मान्य नसेल तर आम्हालाही नवा रस्ता शोधावा लागेल, अशा शब्दांत शरद पवार यांनी कॉंग्रेसशी फारकत घेण्याचे सूचित केले.
Thursday, 19 February 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment