कोलवाळ, दि. १५ (वार्ताहर): अपूर्ण अवस्थेत राहिलेली कोलवाळची ग्रामसभा आज सचिव, विरोधी गट व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडली तरी अखेरपर्यंत सरपंच व सत्तारुढ गटाचे सदस्य तसेच निरीक्षक अनुपस्थित राहिल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. देविदास वारखंडकर, देवानंद नाईक, झेवियर डिसोझा व ज्योती पेडणेकर हे चारच पंच व्यासपीठावर होते. सरपंचांना जनतेला सामोरे जात येत नसेल तर पंचायतच बरखास्त करावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
भंगार अड्डे, मोबाईल मनोरा, मार्केट, गटारे, रस्ते, स्मशान, पाणीपुरवठा आदी समस्या गावाला भेडसावत असताना, यासंबंधीच्या प्रश्नांना उत्तरे देता येणे शक्य नसल्याने सरपंच विठु वेंगुर्लेकर व त्यांचे समर्थक सदस्य अनुपस्थित राहिल्याचा सूर या ग्रामसभेत व्यक्त झाला. ज्येष्ठ नागरिक सुभाष हर्ळणकर यांना अध्यक्षस्थानी बसवून, सचिव बिपीन कोरगावकर यांच्या उपस्थितीत ग्रामसभेचे कामकाज सुरू करण्यात आले. यापूर्वी विरोधी मत व्यक्त करणाऱ्यांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागले, कारण त्यांच्याविरुद्ध सुडभावनेने राजकीय पातळीवरून तक्रारी करण्यात आल्या, असे मत हळर्णकर यांनी व्यक्त केले. गेली काही वर्षे विद्यमान आमदार निळकंठ हळर्णकर हे सरपंच होते, तथापि त्यांनी काहीही विकास केला नाही, मात्र कॉंग्रेस व राष्ट्रवादी युती झाल्याने ते निवडून आले. गावच्या समस्या उपस्थित करणाऱ्यांनाच त्यांच्या रोषास पात्र व्हावे लागते, याबद्दल रुद्राक्ष नाईक यांनी संताप व्यक्त केला. सरपंच जर लोकांना सामोरे जाऊ शकत नसतील, तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी रामदास नाईक यांनी केली.
आठवड्यातून एकवेळ पंचायतीत आमदारांनी येण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित करून, ते यासंबंधी सरपंचांना पूर्वकल्पना देतात का,असे साजू गावकर यांनी विचारले. मिनेझीस यांनी आमदारांनी ग्रामसभेला यावे,अशी सूचना केली. सोमवारी पंचसदस्यांची बैठक होते, त्यावेळी ग्रामस्थांनी जमावे, अशी सूचना राजू गावकर व रामदास नाईक यांनी केली असता, सर्वांनी सहमती दर्शविली. पंचायत विसर्जित करा आणि संबंधित गैरप्रकार तपासासाठी "व्हिजिलन्स'कडे पाठवा अशी जोरदार मागणी उपस्थितांनी केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment