जलवाहतूक मंत्री म्हणतात--
..मांडवीत कॅसिनोंना पूर्ण विरोध
..कॅसिनोंमुळे जलवाहतुकीस अडथळा
..तक्रारीनंतरही कारवाई नाही
..रस्त्यावर बेशिस्त पार्किंग
..जहाजावर रेस्टॉरंट सुरू
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): मांडवी नदीत दोन कॅसिनो बेकायदा ठाण मांडून असून त्या त्वरित हटवण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आल्याचे आज जलवाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. ते आज पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. मांडवीत येणाऱ्या कॅसिनोंना आपला पूर्वीपासून विरोध असल्याचेही यावेळी श्री. ढवळीकर यांनी सांगितले.
मांडवी नदीत नांगर टाकून असलेल्या काही कॅसिनो जहाजांना कोणतीही परवानगी नाही. या जहाजामुळे मांडवी नदीत अन्य जहाजांना वाहतूक करण्यास अडथळे निर्माण होत असल्याच्या तक्रारी आपल्यापर्यंत पोचलेल्या आहेत. या जहाजांवर कारवाई करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असून त्यांनी अद्याप जलवाहतूक खात्याने त्यांना केलेल्या तक्रारीवर कोणतीच कारवाई केलेली नाही.
त्यामुळे यापुढे कॅसिनो जहाज परवान्यांचे नूतनीकरण केले जाणार नसल्याचेही यावेळी श्री. ढवळीकर यांनी स्पष्ट केले. मांडवी जेटीच्या बाजूला एक जहाज उभे करून ठेवण्यात आले असून त्याला कोणतीच परवानगी नाही. या जहाजामध्ये रेस्टॉरंट सुरू केली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे तेही हटवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
कॅसिनोंवर जाण्यासाठी रात्रीच्यावेळी रस्त्यावरच वाहने उभी करून ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे अन्य वाहतुकीला त्याचा त्रास सहन करावा लागतो. पोलिसांनी त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करून हा प्रश्न पूर्णपणे कायदा व सुव्यवस्थेचा आहे. त्यामुळे पोलिसांनी या वाहनांवर कारवाई न केल्यास येथील वाहने ताब्यात घेण्यासाठी वाहतूक अधिकाऱ्यांना आदेश दिला जाणार असल्याचे यावेळी श्री. ढवळीकर यांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसांपूर्वी आशिया खंडातील सर्वांत मोठा तरंगता महाराजा कॅसिनो गोव्यात दाखल झाला आहे. त्यालाही जलवाहतूक खात्याने परवानगी दिली नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली. रात्रीच्यावेळी या कॅसिनोत जुगार खेळण्यासाठी जाणाऱ्या लोकांच्या आणि पर्यटकांना घेऊन येणारी वाहने मुख्य रस्त्याच्याच बाजूला उभ्या केल्या जातात. याठिकाणी कोणतेही वाहन उभे करता येत नाही. या संपूर्ण "नो पाकिर्ंग झोन' असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. परंतु, पोलिस याठिकाणी उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर पोलिस कोणतीच कारवाई करीत नसल्याने श्री. ढवळीकर यांनी आश्चर्य व्यक्त केले.
Friday, 20 February 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment