--------------------------------
श्रीसाईबाबा पादुका दर्शन
सोहळा विशेष रंगीत पुरवणी
उद्याच्या "गोवादूत'सोबत
--------------------------------
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): श्रीसाईबाबांच्या चावडी पूजनाच्या शताब्दीनिमित्त येथील कांपाल मैदानावर आयोजित श्रीसाईबाबा पादुका दर्शन सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, उद्या सायंकाळी ४ वाजता पत्रादेवी येथे मुख्यमंत्री दिगंबर कामत श्रींच्या पादुकांचे स्वागत करतील, अशी माहिती दर्शन सोहळा समितीचे अध्यक्ष अनिल खवंटे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत समितीचे सचिव दिलीप पालयेकर, खजिनदार विवेक पार्सेकर, श्रीसाईबाबा शिर्डी संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे, डॉ. गोंडकर व स्थानिक कार्यकर्ते रवी नायडू उपस्थित होते.
१८५८ ते १५ ऑक्टोबर १९१८ या ६० वर्षाच्या आपल्या कालखंडात साईबाबांनी एकूण ३ पादुकांचा वापर केला. या तिन्ही पादुका सध्या शिर्डी येथील संग्रहालयात दर्शनासाठी ठेवण्यात येतात. दर गुरुवारी त्यांची विधिवत पूजा केली जाते. या पादुका आजपर्यंत फक्त मुंबई येथे १९९१ साली साईभक्तांच्या मनातील गैरसमज दूर व्हावा या हेतूने दर्शनासाठी साई संस्थानाने उपलब्ध करून दिल्या होत्या. आता साईंचे भक्त देशविदेशांत पोहोचत आहे. परंतु अनेक भक्तांना शिर्डीला प्रत्यक्ष येणे शक्य नसते हे लक्षात घेऊन भारताच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. याचा शुभारंभ गोव्यातून होत आहे. हे गोमंतकीयांचे एक अहोभाग्य आहे. अशा या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानचे विश्वस्त श्री. वाबळे यांनी या परिषदेतून केले.
पादुका रथाचे आगमन व वाटचाल
या पादुकांचे आज २० रोजी शिर्डी येथून पुण्याला प्रयाण झाले असून सायं. ५ वाजेपर्यंत त्या कराड येथे पोहोचतील. त्यानंतर उद्या दि. २१ रोजी दुपारी २ वाजता हा पादुकारथ पत्रादेवी येथे पोहोचेल. त्या ठिकाणी ३ ते ४.३० पर्यंत भजन होईल. ४.३० वाजता मुख्यमंत्री श्री. कामत त्यांचे गोव्याच्या सीमेवर स्वागत करतील. यावेळी हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन धर्मातील प्रत्येकी एक प्रतिनिधी ज्योत पेटवतील. त्यानंतर या पादुकारथाचे ६ वाजता मालपे जंक्शनवर आमदार दयानंद सोपटे व लक्ष्मीकांत पार्सेकर पादुकांचे स्वागत करतील. ६.३० वाजता धारगळ महाद्वारावर पंचायतमंत्री बाबू आजगावकर, ७ वाजता कोलवाळ पुलावर आमदार नीळकंठ हळर्णकर, ७.४५ वाजता करसवाडा जंक्शनवर आमदार फ्रान्सिस डिसोझा व नगराध्यक्ष रुपा भक्ता, ८.१५ वाजता ग्रीन पार्क जंक्शनवर माजी आमदार दिलीप परुळेकर, ८.४५ वाजता पर्वरी आझाद भवनाजवळ आमदार दयानंद नार्वेकर व रात्री ९.३० वाजता पणजीत जुन्या पाटो पुलावर विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर व महापौर टोनी रॉड्रिगिस या पादुकांचे स्वागत करतील.
कार्यक्रमाची रुपरेषा
एकंदरीत कार्यक्रमाची रुपरेषा स्पष्ट करताना आयोजन समितीचे अध्यक्ष श्री. खवंटे म्हणाले की, या सोहळ्याअंतर्गत प्रसिद्धी, जाहिरात, सजावट, महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रथमोपचार, सुरक्षा आदींवर सुमारे ४० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातून सुमारे एक लाख भाविक, दर्शनार्थींचा अंदाज आहे. हे लक्षात घेऊन संपूर्ण तयारी केली आहे. यासाठी एकाचवेळी मैदानावर २५ हजार लोक वावरू शकतील व मंडपात १० हजार लोक सहज मावतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्या दिवशी दुपारी १२.३० वाजता महाप्रसादाची व्यवस्था असून सुमारे ३५ ते ४० हजार लोकांना पुरेल इतक्या प्रमाणात महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त अल्पोपाहाराचीही व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी खास शिर्डी येथील उदी व एक लाडू प्रसादरुपाने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शिर्डी येथील ६ ग्रंथप्रदर्शनाची दुकाने लावण्यात येतील. यामध्ये सवलतीच्या दरात साईंची ग्रंथसंपदा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. सकाळी ६ वाजल्यापासून हा दर्शनसोहळा सुरू होईल. मध्यान्ह आरती, महाप्रसाद, धूपारती, भजन व आरती या व्यतिरिक्त मध्ये मध्ये गोमंतकीय कलाकार सांस्कृतिक कला सादर करणार आहेत. तसेच रात्री प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल आपली कला सादर करतील.
वाहतुकीत बदल
दि. २२ रोजी कला अकादमी ते मिरामारपर्यंतची वाहतूक बंद करण्यात आली असून मडगाव मार्गे येणाऱ्या गाड्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयापासून वळवण्यात आल्या आहेत. गोमेकॉपासून गोवा विद्यापीठ मार्गे दोना पावला व मिरामार अशा गाड्या धावतील. तसेच सोहळ्यास येऊ इच्छिणाऱ्यासाठी काणकोण, मडगाव, वास्को, सावर्डे, फोंडा, म्हापसा, पेडणे, वाळपई, साखळी व डिचोली येथील कदंब बसस्थानकावरून सकाळी ६.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. कांपाल मैदानावरून शेवटची गाडी रात्रौ ८ वाजता सुटेल.
भक्तांना सूचना
दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनी नारळ, हार, उदबत्ती अथवा कोणतेही पूजेचे साहित्य अथवा प्रसाद घेऊन येऊ नये. फुलांची व्यवस्था मैदानावर करण्यात आली आहे, असे श्री. खवंटे यांनी या परिषदेत सांगितले. गोमंतकीयांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहून दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. २३ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर त्या प्रस्थान करतील.
संमेलनाची रूपरेषा
दि. २२ रोजी सायंकाळी ४ ते ६.३० पर्यंत एका संमेलनाचे आयोजन केले असून यामध्ये संस्थानाचे विश्वस्त जयंत ससाणे, मुख्यमंत्री श्री. कामत, विरोधी पक्षनेते श्री. पर्रीकर, पिंगुळी येथील संत प. पू. अण्णा राऊळ महाराज उपस्थित राहणार आहेत.
Saturday, 21 February 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment