Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 15 February 2009

संगीत नाटकांच्या संजीवनीसाठी खास नाट्यशाळा स्थापणे गरजेचे

मराठी नाट्यसंमेलनाध्यक्ष रामदास कामत यांचे प्रतिपादन

बीड,(केशरबाई क्षीरसागर नाट्यनगरी) दि. १४ - संगीत नाटकांना नवसंजीववनी देण्यासाठी शासकीय पातळीवर एनएसडीच्या धर्तीवर "स्कूल ऑफ म्युझिकल ड्रामा' स्थापन करण्याची गरज आहे. त्यामुळे संगीत नाटकांचे प्रयोग राज्यात आणि राज्याबाहेरदेखील होतील. तसेच कलावंतांना रोजगारही मिळेल असे प्रतिपादन बीड येथे ८९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष रामदास कामत यांनी केले.
संमेलनाचे अध्यक्ष रामदास कामत यांनी संगीत नाटक व मराठी रंगभूमीबद्दलचे आपले विचार प्रभावीपणे मांडले. विशेषतः संगीत नाटकाला पुन्हा एकदा भरभराटीचे दिवस यावेत यासाठी त्यांनी काही योजनाही सुचविल्या. संहितांचा अभाव असल्याने संगीतप्रधान नाटके थंडावली असल्याचे ते म्हणाले. अशा नवीन नाटकांसाठी स्वतंत्र कार्यशाळा भरवावी, मात्र केवळ नाटकात गाणी घातली म्हणजे ते संगीत नाटक होत नाही तर ज्या नाटकांतून गाणी वगळली तर ते नाटकच पुढे जाऊ शकत नाही, असे नाटक म्हणजे संगीत नाटक ! संगीत नाटक आनंदाचे, सुगंधाचे सुखनिधान असायला हवे. पारंपारिक प्रकृतीची संगीत नाटके जरी लिहिली नाही तरी सहज प्रकृतीची नाटके रंगभूमीवर आवश्यक यावी असे त्यांनी सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणाचा समारोप रामदास कामत यांनी, "सर्वात्मका सर्वेश्वरा' या नाट्यपदाने करताच श्रोत्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला...
त्यापूर्वी कै.केशरबाई क्षीरसागर नाट्यनगरीत अखिल भारतीय नाट्यपरिषदेच्या ८९व्या मराठी नाट्यसम्मेलनाचे उद्घाटन आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले.या कार्यक्र माला मान्यवरांसह ५० हजारांपेक्षा अधिक नाटयरसिक उपस्थित होते. मावळते अध्यक्ष रमेश देव यांनी अध्यक्षपदाची सूत्रे ज्येष्ठ गोमंतकीय गायक तथा रंगकर्मी रामदास कामत यांच्याकडे सुपूर्द केली.
नाट्रयसंम्मेलनाच्या शानदार उद्घाटनापूर्वी बीड शहरातून नाटयदिंडी निघाली. या दिंडीमध्ये रामदास कामत,मोहन जोशी,दिलीप प्रभावळकर,विक्रम गोखले,स्मिता तळवळकर,नीलम शिर्के,भार्गवी चिरमुले आदी कलावंत सहभागी होते.हत्ती,घोडे,उंट यामुळे दिंडीला आगळीवेगळी शोभा आली.
दिंडीनंतर आद्यकवी मुकुंदराज रंगमंचावर उद्घाटन सोहळा झाला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री चव्हाण यांनी,"मराठी कलावंतांमुळे महाराष्ट्राला सांस्कृतिकदृष्टया गौरवशाली इतिहास लाभला. मराठी कलावंतानी आपली कला सातासमुद्रापार न्यावी मात्र इथल्या मातीशी असलेली नाळ तोडू नये', त्यांची कला पुण्यामुंबई पुरतीच मर्यादित न ठेवता ती जिल्ह्या जिल्ह्यापर्यंत नेली पाहिजे.
तालुक्याच्या ठिकाणी छोटी छोटी नाट्यगृहे उभारण्याच्या योजनेला अधिक गती दिली जाईल. यामुळेच कलावंतांना आपली कला अधिक वृद्धिंगत करता येईल. ग्रामीण भागातूनच मकरंद अनासपूरे सारखा कलावंत पुढे आला याचा आम्हाला अभिमान असून अशा कलावंतांमुळे मराठी चित्रपटांना चांगले दिवस येतील अशा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या मागणी संदर्भातही मुख्यमंत्र्यांनी मकरंद अनासपूरे यांच्या स्वप्नांचा उल्लेख करीत या मार्गासाठी राज्य सरकार आपला दोनशे कोटी रूपयांचा हिस्सा देईल याचा पुनरूच्चार केला. बीडकरांच्या अपेक्षा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासन सर्वातोपरी प्रयत्न करील. मराठवाडयात विमानतळे झाली पण रेल्वे लाईन आली नाही अशी खंतही मुख्यमंत्री चव्हाण यांनी व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर सम्मेलनाध्यक्ष रामदास कामत,रमेश देव,मकरंद अनासपुरे,मंत्री बबनराव पाचपुते, सार्वजनिक बांधकाममंत्री विमलताइर्‌र मुंदडा,मोहन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments: