Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 16 February 2009

प्राचीन संस्कृती जपणारे देश एकवटले नागपूर परिषदेत दहशतवादाविरोधात लढा देण्याचा निर्धार

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): "प्राचीन संस्कृती व सभ्यतेचे जतनः आव्हाने आणि उपाय' या संकल्पनेवर नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या परिषदेत दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी प्राचीन संस्कृती जपणाऱ्या देशांनी एकत्र येण्याचा निर्धार केला आहे. प्राचीन संस्कृती आणि सभ्यतेचे जतन ही काळाची गरज असून, आपण सर्वांनी याची पूर्तता करण्यासाठी एका व्यासपीठावर येणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन तिबेटचे पंतप्रधान सॅम डॉंग रिमपोचे यांनी यावेळी केले.
विविध धर्म व संस्कृतीच्या प्रतिनिधींच्या या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनसमयी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जगातील ५२ विविध राष्ट्रांतून सुमारे ३०० प्रतिनिधींनी या परिषदेत भाग घेतला होता. तीन वर्षांतून एकदाच भरणाऱ्या या परिषदेत सहभागी होण्यासाठी गोव्यातील शिक्षणतज्ज्ञ दत्ता भी. नाईक खास उपस्थित राहिले होते. परिषदेचे आयोजन "इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडिज आणि वर्ल्ड काऊन्सिल ऑफ एल्डर्स ऑफ एन्शंट ट्रेडिशन ऍण्ड कल्चर'च्या नागपूर शाखेने केले होते.
रिमपोचे म्हणाले, "संस्कृती आणि परंपरेशिवाय जग म्हणजे आपले मूळस्थान गमावलेल्या जमावाप्रमाणे भासेल, जिथे पुनःर्स्थापनेला वाव नसेल. संस्कृती आणि परंपरा मानवाला या भूतलावरील अन्य जीवजंतूपासून वेगळी ओळख देण्यास साहाय्यभूत होते. एखादी रूढी वा सवय केवळ वर्षानुवर्षे अवलंबिली जाते म्हणून तिला परंपरा म्हणता येणार नाही. क्रियाशीलता, विचार वा युक्ती अथवा त्यामागे एखादे तत्त्वज्ञान असावे जे धार्मिक स्रोतांकडून आलेले असावे. एका योग्य संदेशवाहकाद्वारे वा माध्यमातून वा ज्याने प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला आहे अशा व्यक्तीकडून आलेल्या गोष्टीलाच परंपरा म्हणता येते. शिवाय ती गोष्ट बुद्धीला पटणारी व समाजाला पूरक असली पाहिजे.'
संस्कृतीच्या मुळावर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, हा क्रियाशीलतेचा एक भाग आहे. सुरुवातीला केवळ "प्रकृती' वा निसर्ग होता. त्याचे रूपांतर मग "संस्कृती'त झाले. या संस्कृतीचा होत असलेला ऱ्हास त्यास "विकृती'च्या दिशेने नेतो, असे दिसून येते. एखाद्या व्यक्तीचे मन व मतपरिवर्तनास संस्कृती म्हणता येईल. पाश्चिमात्य या शब्दाचा वापर करून केवळ सांस्कृतिक दहशतवाद वा सांस्कृतिक युद्धास खतपाणी घातले जात आहे. या उलट पूर्वेकडील राष्ट्रांत अद्याप संस्कृतीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.
आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. मेधे यांनी संस्कृती आणि सभ्यतेसह विज्ञानाचे महत्त्व विषद केले. परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्र सेविका समितीच्या प्रमिलाताई मेधे यांनी भूषवले.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys