नवी दिल्ली, दि. २० : माजी केंद्रीय दळणवळण मंत्री सुखराम यांना दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयाने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी दोषी ठरविले आहे. त्यांच्यावर ४.२५ कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती बाळगल्याचा आरोप आहे. त्यापैकी २.४५ कोटी रुपयांची संपत्ती त्यांच्या दिल्लीतील घरातून जप्त करण्यात आली होती.
विशेष सीबीआय न्यायाधीश व्ही. के. माहेश्वरी यांनी ८२ वर्षीय सुखराम यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोप निश्चित केले होते. २४ फेब्रुवारी रोजी सुखराम यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये त्यांना जास्तीत-जास्त सात वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते. आजच्या सुनावणीच्या वेळी सुखराम न्यायालयात उपस्थित नव्हते. रोहिणी येथील जिल्हा न्यायालयात सुखराम यांच्यावर आणखी एक गुन्हेगारी खटला सुरू आहे. तेथे उपस्थित राहण्यासाठी आज त्यांच्या वकिलांनी सीबीआय न्यायालयात सुनावणीदरम्यान अनुपस्थित राहण्याची सूट मागितली होती.
लोकसेवक असूनही गुन्हेगारी आचरण असल्याप्रकरणी सीबीआय न्यायाधीशांनी सुखराम यांना दोषी ठरविले. सीबीआय न्यायालयाने म्हटले आहे की, सुखराम यांनी जाहीर केलेल्या स्त्रोतांपेक्षा सुमारे पाच कोटींहून अधिकची संपत्ती मिळविली. सुखराम हे समाजसेवक असूनही त्यांच्याजवळ ५.३६ कोटी रुपयांची चल आणि अचल स्वरूपातील संपत्ती आहे. ते नरसिंहराव मंत्रिमंडळात दळणवळण मंत्री होते. त्यांच्या दिल्ली आणि हिमाचलमधील निवासस्थानांवर सीबीआयने धाड टाकून ३.६१ कोटी रुपये रोख आणि १.२ कोटी रुपयांचे दागिने जप्त केले होते. याशिवाय बॅंकांमध्ये ४.२ लाख रुपये आणि घरगुती वस्तूंच्या स्वरूपात १.३ लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती.
सुखराम यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यावेळी त्यांनी आपल्यावरील आरोपांचा इन्कार केला होता. आपल्याकडे असणारी रक्कम कॉंग्रेस पार्टीचा निधी असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर लगेचच सीबीआयने याप्रकरणी तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव आणि कॉंग्रेसाध्यक्ष सीताराम केसरी यांची चौकशी केली होती. त्यावेळी या दोन्ही नेत्यांनी सुखराम यांचा दावा फेटाळून लावीत त्यांच्याकडील संपत्ती ही पार्टी फंड नसल्याचे म्हटले होते.
Saturday, 21 February 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment