Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 19 February 2009

"दिलखुलास' प्रभावळकर!




-विद्या नाईक
सारस्वत बॅंकेचे प्रचारदूत तथा चतुरस्त्र अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी जीवभौतिकशास्त्रात (बायोफिजिक्स) पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरमधून पदविकाही घेतली. त्यानंतर त्यांनी अनेक वर्षे एका फार्मास्युटिकल कंपनीत नोकरीही केली. हे करतानाच त्यांनी बालनाट्यात भूमिका करायला सुरुवात केली. तथापि, खऱ्या अर्थाने त्यांचा रंगभूमीवरचा प्रवेश विजय तेंडूलकर लिखित "लोभ नसावा ही विनंती' या नाटकातून झाला. बुधवारी पणजीतील सारस्वत बॅंकेमध्ये त्यांनी "गोवादूत'शी दिलखुलास गप्पा मारल्या. त्यासंबंधी...

"मी असा कसा?... असा कसा? वेगळा... वेगळा...' म्हणत "चौकट राजा'तील आपल्या भूमिकेच्या वेगळेपणास पडद्यावर उतरवणारे दिलीप प्रभावळकर प्रत्यक्षातही किती "वेगळे' आहेत, याची झलक बुधवारी स्वारस्वत बॅंकेच्या प्रत्येक ग्राहकास पाहावयास मिळाली. या बॅंकेचे प्रचारदूत म्हणजेच ब्रॅंड ऍम्बेसिडर म्हणून आपली "भूमिका' अगदी चोख बजावताना प्रत्येकाचे हसतमुख स्वागत करणारे दिलीप प्रभावळकर यांना पाहण्याचा योग ध्यानीमनी नसताना आला. दिलीप प्रभावळकर मराठी नाट्य-चित्रसृष्टीतील एक चतुरस्र व्यक्तिमत्त्व! अभिनयाचे उत्तुंग शिखर गाठलेल्या या "नटसम्राटा'ला कुठेच "ग'ची बाधा झाली असावी असे निदान त्याक्षणी तरी वाटले नाही. खरेतर त्यांची निवड सारस्वत बॅंकेच्या ब्रॅंड ऍम्बेसिडरपदी व्हावी हीच त्यांच्या दिलखुलास व्यक्तिमत्त्वाची पोचपावती आहे. कारण बॅंक म्हणजे लोकांच्या विश्वासाचे मूर्तिमंत प्रतीक. आपल्या जीवनाची संपूर्ण पुंजी लोक या ठिकाणी मोठ्या विश्वासाने गुंतवतात. त्यामुळे अशा ठिकाणाचा दाखला जर एका तितक्याच जबाबदार व्यक्तिमत्त्वाने दिला तर त्यावरील जनतेचा विश्वास दृढ होण्यास ते साहाय्यभूत होऊ शकते. दिलीप प्रभावळकर यांच्याबाबतीतही नेमके तेच घडत होते. येणारा प्रत्येक ग्राहक जिथे त्यांच्या "ग्लॅमर'च्या दडपणाखाली दिसत होता, तितकाच त्यांच्याबद्दलचा विश्वास आणि आदरही त्यातून स्पष्ट होत होता. त्यांच्या भूमिकांची प्रशंसा करण्यासाठी शब्दभंडारांची उणीव त्यांना जाणवत होती, पण अगदी वाकून नमस्कार करण्यापासून ते पदस्पर्श करण्यापर्यंत आपल्या भावना आपल्या कृतीतून मांडण्याचा त्यांचा प्रयत्न आणि त्या सगळ्याने अवघडल्यासारखे झालेले दिलीप प्रभावळकर... हे सारे दृश्यच भारावून टाकणारे होते. आज "आदर्श' ही संकल्पना बदलली आहे. पूर्वी देवता, वीरयोद्धे, पुढारी, नेते हे लोकांचे आदर्श असायचे. मात्र आता कलाकारांना आपला आदर्श मानणाऱ्यांचा जमाना आहे. या काळात जर अभिनयाचा आदर्श म्हणून कोणी दिलीप प्रभावळकर हे नाव सांगितले, तर नवल वाटू नये. दिलीप प्रभावळकर हे सारस्वत बॅंकेचे "सेलिब्रिटी ग्राहक'. तथापि, "मुन्नाभाई एमबीबीएस'सारख्या चित्रपटाने अगदी घरोघरी पोहोचलेल्या या "गांधीजीं'ना बॅंकेने आपला प्रचारदूत म्हणून नियुक्त केले आणि ही निवड किती सार्थ होती याची प्रचितीही बॅंकेला आली.
मोजके बोलणे, पण ते बोलताना शब्दफेक किती संयमी असावी याची काळजी घेणे, आपण कोठेही वादग्रस्त ठरणार नाही, याकडे अगदी काटेकोर लक्ष पुरवणे हे बहुतेक त्यांनी आपल्या आजवरच्या अनुभवातून अर्जित केलेले ज्ञान असावे. कारण गोव्यातील चित्रपटसंस्कृती, येथील चित्रपट महोत्सव याबाबत त्यांची उत्तरे अगदी मोजून - मापून दिल्यासारखी भासली. गोव्याचे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक राजेंद्र तालक यांच्या "सॉंवरिया डॉट कॉम' या मराठी चित्रपटात त्यांनी भूमिका केलेली आहे. अनेक मोठमोठ्या दिग्दर्शकांच्या हाताखाली काम केलेल्या प्रभावळकर यांनी प्रांजळ कबुली दिली की कलाकार हा केवळ आपल्या दृश्यांशी निगडीत असतो, या दृश्यांचे पुढे नक्की काय व कसे स्वरूप होईल यापासून अनभिज्ञ! तर दिग्दर्शकाच्या डोक्यात संपूर्ण चित्रपट असतो, त्यामुळे त्याला योग्य दिशेने घेऊन जाण्याचे कार्य एक दिग्दर्शक करतो आणि ती कलात्मकता तालक यांच्यात नक्कीच आढळली असल्याचे त्यांनी सांगितले. हे सांगताना गोव्यात दरवर्षी आयोजित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपण अद्याप सहभागी होऊ शकलो नसल्याने त्याविषयी आपण नक्की सांगू शकत नसल्याचे सांगत त्यांनी त्यावर अधिक भाष्य करणे टाळले. बराच गाजावाजा झालेल्या झी मराठीच्या "लिटल् चॅम्पस्' पैकी एक शाल्मली सुखठणकरचा उल्लेख होणे ही तशी स्वाभाविक गोष्ट होती, तर तिनेही आपल्या "टिपरे' या पात्राला पुन्हा एकदा (आता ही मालिका संपली आहे, पण सुरू होती त्यावेळी सर्वांत यशस्वी मालिका म्हणून त्याकडे पाहिले जात असे. प्रभावळकरांच्या "अनुदिनी'वर आधारित ही मालिका आहे.) घरोघरी पोचवल्याचेही स्मितहास्य करत त्यांनी सांगितले. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत एक कसदार अभिनेता म्हणून ओळखला जाणारा हा कलाकार आजही आपण "दिलीप प्रभावळकर' म्हणून पूर्ण समाधानी असलो तरी एक अभिनेता म्हणून असमाधानी असल्याचे सांगतो.

No comments: