वेर्ला काणका, दि. १५ (वार्ताहर): सरकार आमच्या सहनशीलतेचा अंत आणखी किती काळ पाहणार? पर्यावरण व आरोग्याशी सुरू असलेला खेळ आता पुरे झाला. सरकारने "रिव्हर प्रिन्सेस' हे जहाज त्वरित हटवावे अन्यथा जनतेलाच ते हटवावे लागेल, असा इशारा आज सुमारे पाचशे कळंगुटवासीयांनी मोर्चाद्वारे देऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
गेल्या नऊ वर्षांपासून हे तेलवाहू जहाज कांदोळी किनाऱ्यावर रुतले आहे. त्यामुळे पर्यावरणाबरोबरच स्थानिकांच्या आरोग्यालाही धोका उत्पन्न झाला आहे. मात्र, सरकारची चालढकल सुरू असल्याने लोकांचा संताप अनावर होत चालला आहे. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास स्थानिकांनी सरकारला कडक इशारा देण्यासाठी उत्स्फूर्तपणे मोर्चा काढला. यात महिला व मुलांचा मोठा सहभाग होता. एक-दो एक-दो रिव्हर प्रिन्सेस फेक दो अशा घोषणांनी मोर्चेकऱ्यांनी सारा परिसर दणाणून सोडला. महिला व मुलांनी सरकारचा निषेध करणारे फलक हाती घेतले होते. विशेष म्हणजे या मोर्चात काही जागरुक परदेशी पर्यटकही सामील झाले होते. नंतर या मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले.
याप्रसंगी डॉ. ऑस्कर रिबेल्लो यांनी दिगंबर कामत सरकारला हे जहाज त्वरित हटवण्याचा इशारा दिला. सरकार फक्त टोलवाटोलवी करत आहे. लोकांचे आरोग्य व पर्यावरणाचा मुद्दा या जहाजामुळे गंभीर बनला आहे. राजकीय नेते फक्त पैसा करण्यात मग्न आहेत. सरकारला जर हे जहाज हटवता येत नसेल तर आता स्थानिकच एकत्र येऊन ते हटवतील, असे ते म्हणाले.
स्थानिक महिला श्रीमती मामा सिसिलिया यांनीही सरकारच्या निष्क्रियतेवर जोरदार कोरडे ओढले. त्याखेरीज अन्य वक्त्यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. सभा संपल्यानंतर स्थानिक आमदार आग्नेल फर्नांडिस तेथे प्रगटले. नंतर त्यांची याप्रश्नी आंदोलकांशी चर्चा झाली.
Monday, 16 February 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment