Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 15 February 2009

कसाबवर दोन दिवसांत आरोपपत्र - ऍड. निकम

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) - मुंबईवरील हल्ला प्रकरणात पोलिसांच्या हाती लागलेला पाकिस्तानचा एकमेव दहशतवादी अजमल अमीर कसाब याच्या विरोधात येत्या दोन दिवसांत आरोपपत्र दाखल केले जाणार असून या हल्ल्याची सुनावणी पाकिस्तानात घेण्यात अर्थ नाही, असे मत आज महाराष्ट्राचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.
पाकिस्तानातून "हॉटेल ताज'मध्ये नरसंहार करणाऱ्या दहशतवाद्यांना मिळणारे आदेश आणि हल्ल्याचा पाकिस्तानात शिजलेला कट याचे सर्व पुरावे आमच्याकडे असून आता केवळ त्याची सांगड घातली जाणार आहे. शिक्षणाचा अभाव, गरिबी आणि धर्माविषयीचे चुकीचे शिक्षण देऊन त्यांना दहशतवादी बनवले जाते. त्यामुळे दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी पाकिस्तानच्या विरोधात युद्ध हा पर्याय नसून दहशतवाद्यांना घडवणाऱ्या त्या मानसिकतेवर हल्ला केला पाहिजे, असे ऍड. निकम म्हणाले.
पणजीतील मेकॅनिझ पॅलेसमध्ये ते आज गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील रोट्रॅकने आयोजिलेल्या दोन दिवसांच्या परिषदेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आशिष वेर्लेकर, परेश पालेकर, परेश रिवणकर, गुरुदत्त भक्ता व सचिन मेंडुस उपस्थित होते. इलॅक्ट्रॉनिक मीडियाने काय दाखवावे आणि काय दाखवू नये, यासाठी कायदा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, मुंबई हल्ल्याच्या वृत्त वाहिन्यांवरून प्रसारित होणाऱ्या माहितीच्या आधारे हॉटेलात तळ ठोकलेल्या दहशतवाद्यांना आदेश मिळत होते, असे ऍड. निकम यांनी सांगितले.
बिनतोड युक्तिवादांद्वारे दहशतवाद्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाणाऱ्या ऍड. निकम यांनी आपल्या मुख्य भाषणाच्या वेळी स्वतः रचलेल्या कविता सादर करून उपस्थितांकडून टाळ्या मिळवल्या.
स्वतःविषयी बोलताना ते म्हणाले, "वडिलांच्या इच्छेने मी कायद्याचे शिक्षण घ्यायला महाविद्यालयात प्रवेश घेतला; परंतु मन काही रमत नव्हते. त्यामुळे संतापाने वर्गात बसल्या बसल्या कविता सुचत होत्या. सर्वांत आधी केलेली कविता ही की " बायको कोणाला म्हणावं'
दोनच धर्म
दहशतवाद्यांना कोणतीच जात किंवा धर्म नसतो. परंतु, त्याचा एकच उद्देश असतो आणि त्यासाठी ते लढतात. मला वाटणारे दोनच धर्म आहे. एक राष्ट्रप्रेमी आणि दुसरा राष्ट्रद्रोही. यातील काही स्वयंघोषित स्वतःला स्वातंत्र्यसेनानी म्हणवून घेतात. मात्र ते कधीच तसे होऊ शकत नाहीत. कारण स्वातंत्र्यसैनिकत्र निष्पाप लोकांना ओलिस ठेवत नाहीत. आजच्या तरुणांची आणि तरुणींची चाल ही कुलवंताची चाल असली पाहिजे. त्यासाठी सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांनी त्याची काळजी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.
फिदायीन हल्ला हा नवीन प्रकार सुरू झाला असून दोन समाजामधे दरी वाढत असल्यानेच हे विचार रुजवले जात आहे. भारतात सर्व धर्मीय लोक गुण्यागोविंदाने नांद असल्यानेच भारतात जास्त दहशतवादी हल्ले करून येथील शांतता आणि सलोखा बिघडवण्याचे काम सुरू आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
काही कायदे बदलणे गरजेचे आहे. भारतात नरसंहार करण्यासाठी दहशतवादी आयात केले जातात. भारतातील सुरक्षा व गुप्तहेर यंत्रणा काय काम करतात, याचाही आढावा घेतला पाहिजे, ही जाणीव मुंबई हल्ल्यानंतर झाली. या हल्ल्यामुळे देशाला बरेच काही शिकण्यासही मिळाले, असे ते शेवटी म्हणाले.

No comments: