पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): मांडवी तीरावरील जल कॅसिनोंना राज्यात जोरदार विरोध होत असतानाच आशियाातील सर्वांत मोठे "महाराजा कॅसिनो'हे जहाज आज दुपारी मांडवीत अवतरले. गेल्या दोन महिन्यापासून ते मांडवी तीरावर येण्याच्या प्रतीक्षेत होते. आज त्यांना हवे असलेले सर्व परवाने राज्य सरकारने दिल्याने दुपारी जहाजाने मांडवीत प्रवेश केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या आलिशान जहाजाचे आगमन झाल्यामुळे राज्यात पुन्हा कॅसिनोविरोधी आंदोलनाला नव्याने तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
'महाराजा कॅसिनो' हा मांडवी नदीतील सहावा कॅसिनो असून राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या सातपैकी अजून एक कॅसिनो मांडवीत दाखल होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यामपासून मुंबई समुद्रात नांगर टाकून असलेल्या या कॅसिनोने गोव्याकडे आपला मोर्चा वळवला असून त्याविरोधात राज्यात सध्या तीव्र संताप खदखदत आहे. कॅप्टन ऑफ पोर्टपासून सुमारे २० मीटरवर हे जहाज नांगरून ठेवण्यात आले आहे. यात प्रवेशासाठी दोन छोट्या होड्याही त्याठिकाणी उपलब्ध आहेत.
२२ हजार चौरस मीटर रुंद असलेल्या या कॅसिनोत जुगार खेळण्याची ३५ टेबल्स आहेत. या कॅसिनोत खेळण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. हे जहाज पाच वर्षांसाठी या ठिकाणी नांगरून ठेवण्यास १० लाख रुपये भरल्याचीही माहिती मिळाली आहे. या जहाजाच्या पाठोपाठ काडमांडू येथील काही तरंगते कॅसिनो गोव्यात येण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे.
"पान इंडिया नेटवर्क इंफ्राव्हेस्ट प्रा. लि' या कंपनीचे हे "महाराजा कॅसिनो' जहाज असून सुभाषचंद्र त्याचे मालक आहेत. सध्या मांडवीत "काराव्हेला', "रियो', "प्राईड ऑफ गोवा', "किंग कॅसिनो' व "कॅसिनो रॉयल' हे पाच तरंगते कॅसिनो नांगर टाकून आहेत.
Wednesday, 18 February 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment