- हिवरगाव पायथ्याशी गाडीत मृतदेह सापडले
- अशोक नागेशकर कुटुंबीय
- स्कॉर्पियोची नोंदणी मुंबईची
- म्हापसावासीयांना मोठा धक्का
म्हापसा, दि. २६ (प्रतिनिधी): येथील आझिलो इस्पितळाजवळील एका इमारतीत राहाणाऱ्या नागेशकर कुटुंबातील तिघांचे मृतदेह महाराष्ट्राच्या नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे हिवरगाव पायथ्याशी एका गाडीत सापडल्याने म्हापसा परिसरात खळबळ माजली आहे. या वृत्ताने म्हापसावासीयांना धक्काच बसला. अशोक नागेशकर, त्यांची पत्नी विजया नागेशकर व त्यांचा मुलगा सिद्धार्थ उर्फ सिद्धू हे तिघेजण संगमनेर येथे एमएच ०६-टी ३७०१ या क्रमांकाच्या स्कॉर्पियो गाडीत मृतावस्थेत आढळले. ही माहिती संगमनेर पोलिसांनी म्हापसा पोलिसांना आज सकाळी सुमारे १० वाजता दूरध्वनीवरून दिली.
नागेशकर हे मुंबईला लीलावती इस्पितळात औषधोपचारासाठी जात असत. यावेळी त्यांनी वेर्ला येथील आर्लेकर नावाच्या व्यक्तीची गाडी भाड्याने घेतली होती. ही गाडी आर्लेकर यांच्या भावोजीची असून ती गोव्यात भाडेपट्टीवर दिली जाते.
मुंबईहून नागेशकर कुटुंब नाशिकला आयुर्वेदिक उपचारासाठी पुढे गेले. त्यावेळी महामार्गावर हा प्रकार घडला. वाहनाला अपघात न होता तिघे मृतावस्थेत सापडल्याने त्यांच्या मृत्युबद्दल गूढ निर्माण झाले आहे. ही गाडी कोण चालवित होते, याची माहिती मिळत नसली तरी सिद्धेश नागेशकर यांच्याजवळ वाहन चालविण्याचा परवाना होता. त्यामुळे तेच गाडी चालवत असावेत, असा अंदाज आहे. सिद्धेश यांच्या खिशात सापडलेला परवाना (लायसन्स) पाहून संगमनेर पोलिसांनी गोवा पोलिसांशी सकाळी संपर्क साधल्याचे समजले. स्कॉर्पियो ही गाडी मुंबई येथे नोंद झालेली आहे. एकंदरित या मृत्युचे गूढ उकलणे हे पोलिसांसमोरील मोठेच आव्हान ठरले आहे.
Thursday, 27 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment