- गोव्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी
- शिपयार्ड व नौसेनेच्या जहाजांची किनारी भागांत नजर
- 'इफ्फी' परिसर व महोत्सव हॉटेलांसाठी खास सुरक्षा
- दाबोळी विमानतळावर 'सीआरपीएफ'ची करडी नजर
पणजी, दि.२७ (प्रतिनिधी) : मुंबईत दहशतवाद्यांनी घातलेल्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विदेशी लोकांना लक्ष्य बनवण्याचा दहशतवाद्यांचा मुख्य हेतू असल्याने व गोवा हे पर्यटनस्थळ असून येथे विदेशी पर्यटकांची प्रचंड वर्दळ असल्याने मुख्य पर्यटनस्थळे तसेच सप्त व पंच तारांकित हॉटेलांनाही सुरक्षा पुरवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिली.
आज आल्तिनो येथील आपल्या सरकारी निवासस्थानी पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री रवी नाईक, मुख्य सचिव जे.पी.सिंग,पोलिस महासंचालक ए. एस. ब्रार व पोलिस महानिरीक्षक किशनकुमार हजर होते. मुख्यमंत्री कामत यांनी आज सकाळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांबरोबर सुरक्षे आढावा घेण्यासाठी विशेष बैठक बोलावली. यावेळी गृहमंत्री रवी नाईक व मुख्य सचिव जे.पी.सिंग हजर होते. संध्याकाळी विमानतळ प्राधिकरण व किनारारक्षक दलाच्या अधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली.
गोव्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्याचे आदेश तपासनाक्यावरील पोलिसांना देण्यात आले आहेत. उत्तर व दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांना त्यासंबंधी स्वतः लक्ष देण्याचेही सुचवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कामत यांनी दिली. गोव्यात येणाऱ्या रेलगाड्यांचीही तपासणी होणार असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाशीही संपर्क साधण्यात आला असून विमानतळावरील सुरक्षेबाबत विशेष काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांनी सागरी मार्गाचा अवलंब केल्याने व गोव्यात किनारी भाग येत असल्याने किनारा रक्षक दल, नौसेना यांना सतर्क करण्यात आले आहे. किनारा रक्षक व गोवा शिपयार्ड यांच्याकडून दोन जहाजांची सोय करण्यात आली आहे. ही जहाजे मांडवी व जुवारी नदीतील वाहतुकीवर नजर ठेवणार आहेत. तसेच कांदोळी ते बागा या किनारी पट्ट्यावरही त्यांचे लक्ष असेल.
दक्षिण गोवा व खास करून वास्को, हार्बर आदी भागांची जबाबदारी नौसेना सांभाळेल.
गोवा पोलिस दल व सध्या "इफ्फी'निमित्त बोलावण्यात आलेल्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या दोन तुकड्या येथील परिस्थिती हाताळण्यास समर्थ असल्याचे पोलिस महासंचालक ब्रार यांनी सांगितले.राज्यात सध्या फक्त एकमेव बॉम्ब निकामी करणारे पथक आहे व दुसऱ्या पथकाचे प्रशिक्षण सुरू आहे,असे मुख्य सचिव श्री.सिंग म्हणाले. सागरी पोलिस विभागात सध्या एकूण ६५ ते ७० पोलिस कर्मचारी काम करतात. गोवा शिपयार्डकडे सध्या १२ टेहळणी नौका तयार करण्याचे काम सुरू असून येत्या मे महिन्यात या नौका या दलाच्या स्वाधीन केल्या जातील,असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, गोव्याला दहशतवादी हल्ल्याचा धोका वगैरे आहे का किंवा त्यासंबंधी गुप्तचर विभागाकडून काही संकेत मिळाले आहेत का,असा सवाल केला असता मुख्यमंत्री कामत यांनी तशी निश्चित काहीही माहिती मिळाली नसल्याचे सांगितले.गृहमंत्री रवी नाईक यांनी मात्र गुप्तचर यंत्रणेकडून यासंबंधात माहिती देण्यात आल्याचे सांगितले परंतु सुरक्षेच्या कारणास्तव ती माहिती उघड करणे शक्य नसल्याचे सांगितले.दरम्यान, सुरक्षेसाठी लोकांना काहीप्रमाणात गैरसोय सहन करावी लागणार असल्याने त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे,असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद
मुख्यमंत्री कामत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी संवाद साधून त्यांना संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेधही त्यांनी यावेळी केला. या संवादावेळी मुख्यमंत्री देशमुख यांनी मुंबईत दहशतवाद्यांनी सागरी मार्गाचा अवलंब केल्याच्या प्रकाराची जाणीव करून दिली. गोवा सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता असून सागरी मार्गावर कडक टेहळणी करण्याची सूचना त्यांनी केल्याची माहितीही मुख्यमंत्री कामत यांनी दिली.
'इफ्फी'ला खास सुरक्षा
मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर "इफ्फी' खास सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आले आहे. कला अकादमी, आयनॉक्स, मॅकनिज पॅलेस तसेच सिदाद दी गोवा व हॉटेल मेरियाट यांनाही खास सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कामत यांनी दिली. "इफ्फी' निमित्त विविध प्रतिनिधी गोव्यात आले असून त्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, "इफ्फी' कार्यक्रमांत मात्र कोणताही बदल होणार नसल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
Friday, 28 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment