मडगाव, दि. २६ (प्रतिनिधी): मडगावात वाटमारी, दरोड्यांचे प्रकार अजूनही सर्रास सुरू असून काल रात्री एका मासळी विक्रेतीला याची प्रचीती आली. तिला तब्बल ८३ हजारांचा फटका बसला आहे. गेल्या २४ तासांत पोलिसांना याप्रकरणी कोणताच धागादोरा हाती लागलेला नाही.
विमल चोडणकर नामक ही फातोर्डा येथील महिला नेहमीप्रमाणे घाऊक मासळी मार्केटातील मासेविक्री आटोपल्यावर रात्री साडेनऊच्या सुमारास चालत कदंब बसस्टॅंडवरून ओशिया कॉम्प्लेक्सकडून फातोर्डा येथे जात होती. त्यावेळी ओशियाकडे एक पांढरी मारुती व्हॅन येऊन तिच्याजवळ थांबली. त्यातून चौघे इसम खाली उतरले व त्यांनी तिला पकडून व्हॅनमध्ये कोंबले आणि गाडी भरधाव सोडली. वाटेत त्यांनी तिच्या अंगावरील दागिने तसेच मोबाईल व सात हजारांची रोकड मिळून सुमारे ८३ हजारांचा ऐवज काढून घेतला. त्यानंतर तिला नंतर राय येथे सोडून देण्यात आले. तेथून ती कशीबशी घरी परतली आणि तिने पोलिसांत तक्रार नोंदविली.
"हा प्रकार इतका अचानक घडला की आपण भयभीत झाले व त्यामुळे गाडीचा क्रमांक पाहण्याचेही आपणाला सुचले नाही. त्यातील कोणीच आपल्या परिचयाचे नव्हते', असे तिने म्हटले आहे. पोलिसांनी आज गुन्हेगारांचा शोध लावण्यासाठी बरीच धावपळ केली; मात्र त्यातून विशेष काही साध्य झाले नाही. यापूर्वी आपण पोलिस असल्याचे सांगून महिलांना लुबाडण्याचे प्रकार मडगावात घडले आहेत. तथापि, महिलेचे अपहरण करून तिला लुबाडले जाण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.
Thursday, 27 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment