नवी दिल्ली, दि. २८ : मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सामान्यांना आपल्या प्राणास मुकावे लागले असल्यामुळे माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी आज आपली नाराजी प्रकट केली आहे. दहशतवादाला समूळ उखडून फेकण्याची ताकद असलेल्या सरकारला सत्तेवर बसविण्याचे आवाहन आज दिल्लीकरांना त्यांनी केले.
दिल्ली विधानसभा निवडणुकींच्या निमित्ताने दिल्लीतील लोकांना दिलेल्या संदेशात, दहशतवादी घटना आणि गुन्हेगारीमुळे सर्वसाधारण लोकांमधे असुरक्षेची भावना असल्याचे वाजपेयींनी म्हटले आहे. दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या व सामान्य लोकांच्या प्रति त्यांनी आपल्या शोकसंवेदना प्रकट केल्या आहेत. ठार झालेल्या प्रत्येक भारतीयाबद्दल माझ्या तीव्र भावना आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
दिल्लीकरांना सध्या महागाई, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ, वीज आणि पाण्याची टंचाई, रहदारीची कोंडी, प्रदूषण आदी समस्यांचा सामना करावा लागतो आहे. हे कमी म्हणून की काय, गुन्हेगारी आणि दहशतवादाची यात भर पडली आहे.
कॉंग्रेस सरकारवर टीका करताना कॉंग्रेसने अराजकाची स्थिती निर्माण केली आहे असे ते म्हणाले. नवीन सुरुवात करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे व चांगले आयुष्य जगता येण्यासाठी लोकांनी भाजपाला प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.
Saturday, 29 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment