Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 29 November 2008

'मिशन ओबेराय' पूर्ण, मृतांची संख्या १५५, चारशे जखमी ९३ देशीविदेशी पर्यटकांची सुटका

मुंबई, दि. २८ : दहशतवाद्यांनी मुंबईतील ओबेराय, ताज व नरिमन या इमारतींवर कब्जा मिळवून सुरू केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी ताजमध्ये दोघा दहशतवाद्यांना यमसदनी पाठविले. यात चार पर्यटकांनाही आपला जीव गमवावा लागला. आजच्या कारवाईत एका लष्करी अधिकाऱ्यासह एक कमांडो शहीद झाला. दिवसभरात ताजमध्ये ७ ते ८ तर नरीमन हाऊसमध्ये ११ हातबॉम्ब दहशतवाद्यांकडून फोडण्यात आले.ताज व नरीमनमधील दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई "करो या मरो'अशीच ठरली. ही मोहिमही फत्ते झाली आहे. हॉटेल ओबेरायमध्ये दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलेल्या ९३ देशी-विदेशी पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. नरिमन हाऊसमधील कारवाई अजूनही सुरूच आहे. तीन दिवसांपासून कमांडो व दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या या नागरी "युद्धात' मृतांची संख्या १५५ च्या आसपास पोहोचली असून ४०० जण जखमी झाले आहेत.
ओबेरायवर एनजीएसने पूर्णपणे ताबा मिळविण्यात यश मिळविले आहे. गुरूवारी मध्यरात्रीनंतर शांत झालेल्या धुमश्चक्रीला आज शुक्रवारी दुपारनंतर वेग आला. ताजवर ताबा मिळविणाऱ्या दहशतवाद्यांनी खोल्यांमध्ये हातबॉम्ब फोडण्याचे सोडून बाहेर जमलेल्या गर्दीँवर फेकण्यास सुरूवात केली. बेछूट गोळीबारही केला. उत्तरादाखल आतमध्ये अतिशय योजनाबद्ध पद्धतीने शिरलेल्या कमांडोंनेही दहशतवाद्यांवर गोळीबार केला. यामुळे संतापलेल्या दहशतवाद्यांनी हॉटेल बाहेर हातबॉम्ब फेकण्यास सुरुवात केली. ताजमध्ये एकच दहशतवादी असून तो जखमी असल्याचे गुरूवारपासून सांगण्यात येत होते. त्याच्या पायात गोळी शिरल्याचेही पोलिस सूत्रांनी सांगितले. गुरूवारी रात्री ८ ते १२ या चार तासाच्या काळात दहशतवाद्यांनी कोणत्याही स्वरुपाचा आतंक माजविला नाही. त्यामुळे त्यांच्या जवळील शस्त्रसाठा संपला असून कमांडो ताजवर कब्जा मिळविण्यात यशस्वी होत असल्याचे सांगण्यात येत होते. तथापि, मध्यरात्री १२ च्या ठोक्याला दहशतवाद्यांकडून तुफानी गोळीबार झाल्याने पोलिसांसह वृत्तवाहिन्यांकडून करण्यात येत असलेले दावे फोल ठरले. नंतर रात्री १.३० च्या सुमारासही दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या प्रकारामुळे ताजमध्ये खरोखरच जखमी झालेला एकच दहशतवादी आहे किंवा नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला. पोलिसांमधील हा संभ्रम कायम होता. तीन दिवसांपासून एका सेकंदाचीही विश्रांती न घेता दहशतवादी हल्ला करीत असल्याने तीन दिवस पोलिसांनी चालविलेल्या "ऑपेरशन'नंतरही त्यांची संख्या एकाहून अधिक असल्याचे आता चर्चिले जाऊ लागले आहे.
हॉटेल ओबेरायमधील १७ कर्मचारी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मारल्या गेल्याचे वृत्त आहे. यात हॉटेलचे जनरल मॅनेजर व त्याच्या परिवाराचाही समावेश आहे. बुधवारपासून दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेल्या ओबेरायमध्ये आज तिसऱ्या दिवशीही ९३ देशी-विदेशी नागरीक ओलिस होते. पहाटेनंतर पोलिसांनी सुरू केलेल्या गोपनीय शोध मोहिमेनंतर सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. नंतर कमांडोने अत्यंत शांततपणे समयसुचकता पाळून दहशतवाद्यांविरुद्ध लढा उभारला. यात दोन दहशतवादी मारले गेले. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार जणांना आपल्या प्राणास मुकावे लागले. एका मागोमाग एक मजला आपल्या ताब्यात घेत कमांडोने दहशतवाद्यांचा खातमा करत ओबेरायवर ताबा मिळविला.
ओबेराय ताब्यात येताच हॉटेल ताज व नरिमन हाऊस येथील दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईला वेग देण्यात आला. ताजमध्ये अजून नेमके किती दहशतवादी आहेत, हे स्पष्ट झाले नसताना एकच दहशतवादी असून तो बॉलरूममध्ये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते आहे. एकच दहशतवादी असल्याचे गृहीत धरून पोलिसांनी त्याला ठार मारण्याच्या हालचालींना वेग दिला आहे. दहशतवाद्याचा लवकरच खातमा करून पोलिस हॉटेल ताजवरही ताबा मिळवितील, असा विश्वास पोलिस अधिकारी व्यक्त करीत आहे. गुरुवारी सायंकाळीसुद्धा अवघ्या एका तासात हॉटेल ताज दहशतवाद्यांच्या तावडीतून मुक्त केले जाईल, असे जाहीरपणे सांगण्यात आले होते. मात्र, गुरुवारची संपूर्ण रात्र व शुक्रवारचा दिवस संपल्यानंतरही पोलिस ताजमधील दहशतवाद्यांना कंठस्नान घालू शकले नव्हते.
नरीमन हाऊस येथे दहशतवाद्यांचा दोन दिवसांपासून सुरू असलेला आतंक आज तिसऱ्या दिवशीही त्याच पद्धतीने सुरू होता. उलट त्याला आज वेग मिळाला होता. हॉटेलच्या चारही बाजूंनी बेछूट गोळीबार केला जात होता. पोलिसांनीही हॉटेलला चारही बाजूंनी घेरून गोळीबार करीत आहेत. जमिनीवरून चौथ्या-पाचव्या मजल्यावर गोळीबार करणे श?य नसल्याने हेलिकॉप्टरच्या माध्यमाने नरीमन हाऊसवर कमांडो उतरविण्यात आले. खालून व वरून दोन्ही बाजूंनी दहशतवाद्यांवर पोलिसांचा गोळीबार करण्यात येत आहे. मात्र, दहशतवाद्यांकडूनही तेवढ्याच वेगाने हल्ले चढवण्यात येत असल्याने नरीमन हाऊस परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हॉटेलमधून पोलिसांवर हातबॉम्ब फेकण्यात येत असले तरी काही बॉम्ब हॉटेलमध्ये पेरून ठेवण्यात आले आहे. ज्या माजल्यावर दहशतवादी नाहीत, असे सांगितले जात आहे तेथेही हातबॉम्बचा स्फोट होऊ लागल्याने दहशतवादी नेमके कोणत्या मजल्यावर व खोलीमध्ये आहेत, याचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. या प्रकारामुळे पोलिसांचे लक्ष वारंवार विचलित होत असल्याचे दिसून येते. हॉटेल ओबेरायवरील मोहीम फत्ते झाल्यानंतर नरिमन हाऊसमधील दहशतवाद्यांविरुद्धची कारवाईदेखील फत्ते झाल्याचे सांगण्यात आले. त्यात पाच ओलिसांना दहशतवाद्यांनी ठार केले तर एक कमांडो शहीद झाला. तसेच ताजमधील दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईने विलक्षण वेग घेतला आहे.
अफवांमुळे आणखी दहशत
हॉटेल ताज, हॉटेल ओबेराय व नरीमन हाऊस येथे एकाचवेळी पोलिस व दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक सुरू असताना शहरात काही ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ले चढविल्याच्या घटनेने प्रचंड दहशत पसरली.
दुपारी चर्च गेट व मेट्रो जवळ कारमध्ये आलेल्या दहशतवाद्यांनी, तसेच सीएसटी स्थानकावरही लोकांवर बेछूट गोळीबार केल्याची अफवा पसरली. यामुळे लोकांमध्ये भीतीचे सावट पसरले. गोळीबार होत असल्याचे शब्द कानी पडताच लोकांमध्ये पळापळ झाली. ताज, ओबेराय व नरिमन समोर असलेली पोलिसांचे काही पथक चर्च गेट व मेट्रोच्या आणि सीएसटीच्या दिशेने रवाना करण्यात आली. परंतु, ती अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
-----------------------------------------------------------
...आणि वाहिन्यांचे प्रक्षेपण थांबवले
या कथित गोळीबाराचे वृत्त वाहिन्यांवर झळकताच काही मिनिटांतच सरकारने सर्व वृत्त वाहिन्यांचे प्रक्षेपण थांबविले. त्यामुळे अर्धा तासपर्यंत कोणालाही बातम्या पाहता आल्या नाहीत. नंतर या वाहिन्या पुन्हा सुरू झाल्या, त्या उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे, अफवांवर विश्वास ठेवू नका, हे आवाहन करीतच. दरम्यानच्या काळात श्री. पाटील यांनी पत्रपरिषद घेऊन या दहशतीमागे पाकिस्तानचाच हात असून त्यासंदर्भात ठोस पुरावे हाती लागल्याची माहिती दिली. तथापि, त्याचा तपशील आणखी दोन दिवसांनी उघड केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी आपल्या या छोटेखानी पत्रपरिषदेची सांगता केली ती "भारतमाता की जय' या घोषणेने.

No comments: