पणजी,दि. २८ (प्रतिनिधी): पाळी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी उद्या २९ रोजी सकाळी ८ वाजता कांपालच्या गोवा गृहविज्ञान महाविद्यालयात सुरू होणार असून त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत विजयी उमेदवाराची घोषणा होईल,अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
२६ नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानाला पाळी मतदारसंघातील मतदारांनी विक्रमी प्रतिसाद दिला. ८०.९२ टक्के मतदानाची नोंद झाली. मतदारांनी आपले माप नक्की कुणाच्या पारड्यात टाकले याचा उलगडा उद्या मतमोजणीनंतर होणार आहे. या निकालाबाबत केवळ पाळी मतदारसंघच नव्हे तर संपूर्ण गोव्यातील जनतेत उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपचे उमेदवार डॉ. प्रमोद सावंत, सत्ताधारी कॉंग्रेसचे उमेदवार प्रताप गावस, अपक्ष डॉ.सुरेश आमोणकर यांच्यातच प्रामुख्याने ही लढत झाली.
या मतदारसंघातील एकूण २२७३० मतदारांपैकी १८३९२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यात ९७३० पुरुष तर ८६६२ महिला मतदारांचा सहभाग आहे. सत्तरीचे युवा नेते तथा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी कॉंग्रेसचे उमेदवार प्रताप गावस यांच्यासाठी अहोरात्र काम केल्याने ही जागा त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. साखळी व हरवळे मिळून एकूण ७ हजार मते आहेत. हरवळे हा भाग भाजप समर्थकांचा आहे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी कॉंग्रेसच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांनी मतदारांना फसवण्याचे प्रयत्न केल्याची तक्रार हरवळेवासीयांनी केली होती. हरवळेचे पंच यशवंत माडकर यांचे बंधू शिवदास माडकर याने या गावातील युवकांना हाताशी धरून एकूण ८२ मतदारांची ओळखपत्रे तपासून देतो,असे सांगून पळवली,अशी माहितीही देण्यात आली आहे.
तीनही प्रमुख उमेदवारांसह सेव्ह गोवा फ्रंटचे जुझेे लोबो व एक अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.भाजपच्या नेत्यांनी पाळी मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला होता. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनीही या मतदारसंघाचा दौरा करून विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारच्या गलथान कारभाराचा समाचार घेतला होता. राज्यात विविध ठिकाणी घडणारे प्रकार व प्रशासनातील फरफट याचा खरोखरच पाळी मतदारांवर काही परिणाम झाला आहे का, हेही उद्याच्या निकालाअंती स्पष्ट होणार आहे. कॉंग्रेस पक्ष सत्तेवर असल्याने त्यांना ही जागा पुन्हा मिळवण्याची जास्त संधी असली तरी भाजपच्या प्रचाराचा धडाका व एकूण कॉंग्रेस आघाडी सरकारच्या अपयशाचा परिणाम येथील मतदारांवर झाल्यास तेथे कॉंग्रेसच्या दृष्टीने वेगळाच निकाल लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
Saturday, 29 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment